मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनचे संशयास्पद मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी करत तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दिशाची हत्या झाली असून यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. ज्यानंतर राज्याच्या अधिवेशनात मोठा गोंधळ झाला होता. अशातच आता दिशा सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिशा सालियन प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली असून तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट आता समोर आला आहे. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. तसेच तिच्या शरीरावर जखमा असल्याचेही त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून रोजी झाला होता. त्यानंतर 11 तारखेला संध्याकाळी 4 वाजता तिचा पोस्टमार्टम रिपोर्ट करण्यात आला. दिशा सालियनच्या शरीरावर म्हणजेच हाताला पायाला आणि छातीजवळ जखमा होत्या. तिच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्त्राव झालेला होता. असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र दिशावर अत्याचार झाल्याचा किंवा बलात्कार झाला नसल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, दिशा सालियन ही सामूहिक बलात्कार आणि निर्घृण हत्येची बळी होती आणि ही तथ्ये दडपण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा दाखवण्यात आला. शवविच्छेदन निष्कर्ष आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे यांच्यातील स्पष्ट विरोधाभास आणि शवविच्छेदन करण्यात अन्यायकारक 60 तासांचा विलंब यावरून लैंगिक अत्याचार करून खून केले असल्याचे दिसून येते. तीन वर्षांपेक्षा अधिक वेळ ही प्रत मालवणी पोलिसांनी दडवून ठेवली, असा दावा तिच्या वकिलांनी ठेवला आहे.