शांता नारायण एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने "EduKit" हा विशेष उपक्रम राबवला. त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एकूण 13 जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या, पेन्सिल, खोडरबर, कंपास बॉक्स, क्रेओन्स आदी उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटण्यात आले.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
हे पोलादपूर तालुक्यातील शाळांमध्ये वाटप करण्यात आले. साहित्य वितरण करण्यात आलेल्या शाळांमध्ये कारंजे आदिवासी वाडी, कारंजे, देवळे, देवळे गाव, दाभिल, केवनाळे, अंबेमाची, लहलूसे, पितळवाडी, नाणेघोळ, महादेवाचा मुरा, कामथे आणि नरवीर तानाजी मालुसरे माध्यमिक विद्यालय देवळे अशा एकूण 13 शाळांमध्ये हे साहित्य वितरित करण्यात आले. हे साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही आनंद पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाला शांता नारायण एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टच्या कांचन शिंदे, शशांक सोनवणे, जीवन पोटफोडे, भवांजी कांबळे,दिपक घोडेस्वार तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांची उपस्थिती लाभली. हा उपक्रम पोलादपूर सारख्या दुर्गम तालुक्यात राबवल्याने ट्रस्टचे कौतूक होत आहे. ज्या शाळांना हे साहित्य वाटप करण्यात आलं त्या सर्व शाळा या डोंगराळ भागात आहेत. गोरगरिबांची मुलं या शाळांमध्ये शिकतात. या उपक्रमा मुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये हातभार लागला आहे.