Ramesh Mhatre Dombivli: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी धुडगूस घालत महिला डॉक्टर, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी रमेश म्हात्रेने महिला डॉक्टरांना अश्लील शिवीगाळही केली. या प्रकाराने डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव साळुंके यांना मोठा धक्का बसला आहे. ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांचे वडील डॉक्टर महेंद्र बाविस्कर यांनी दिली आहे.
रमेश म्हात्रेच्या मारहाणीचा धक्का..
"सहा जुलै रोजी शास्त्रीनगरमध्ये भ्याड हल्ला झाला. तो सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांनी डॉक्टर, नर्सेस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात डॉक्टर, नर्सेस जखमी झाल्या. त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. बाहेर आल्यावर बघून घेऊ अशी भाषा वापरण्यात आली. अशा अवस्थेत डॉक्टरांनी काम कसे करायचे?असं वातावरण निर्माण झाले आहे, असं ते म्हणाले.
तसेच "माझी मुलगी डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि डॉक्टर वैभव साळुंखे यांना मानसिक धक्का बसला आहे. तिच्या मनामध्ये भिती निर्माण झाली आहे. रात्री झोपेतही तिला मारहाण करत आहे, असा भास होतो. झोपेत उठतात आणि आम्हाला कोणी मारत आहे असं बोलतात. तिला आता हॉस्पिटलमध्येही यायला भिती वाटते. पोलीस, बॉडीगार्ड, सुरक्षारक्षकांसमोर हे हल्ले झालेत. हे अत्यंत गंभीर आहे," असं डॉक्टर बावस्कर म्हणाले.
दरम्यान, दोन्ही डॉक्टर पैकी कोणीही राजीनामा दिलेला नाही. रमेश म्हात्रे याला अटक होणारच होती, अटक झाली यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सुरक्षित राहिले पाहिजे त्यांनी सेवा दिली पाहिजे यासाठी सरकारने ठोस आणि कठोर पाऊले उचलली पाहिजे. केडीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये देखील डॉक्टरांना पूर्ण सुरक्षा मिळाली पाहिजे, असंही त्यांनी सांगितले.