Maharashtra ATS Raid: पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्क ठेवणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. राज्यभरातील १५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबवली जात आहे. मुंबईसह ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी ATS ची पथके छापेमारी करत असून, संशयितांच्या हालचाली आणि संपर्कांची चौकशी सुरू आहे.
महाराष्ट्रात एटीएसची कारवाई; 150 ठिकाणी धाड
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाकिस्तानस्थित कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी नवी मुंबईतील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभर सुरू असलेल्या या कारवाईचा भाग म्हणून नवी मुंबईतील काही व्यक्तींची चौकशी करण्यात येत असून, त्यांच्या सोशल मीडिया व्यवहारांची आणि डिजिटल उपकरणांची तपासणी केली जात आहे.
शहजाद भट्टीशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींविरोधात डिजिटल पुरावे गोळा करणे आणि या संपर्कांचे स्वरूप पडताळणे, हा या कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे समजते. या प्रकरणाचा तपास सुरू असून, एटीएसकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित संपर्क ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील १५० हून अधिक जण ATS च्या रडारवर असून, त्यांच्याविरोधात राज्यभर विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी आणि शोधमोहीम सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world