Lonavala Ekvira Devi Temple Dresscode: लोणावळ्याजवळील वेहेरगाव गडावर असलेल्या कुलस्वामिनी एकवीरादेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आज एकवीरा देवस्थान ट्रस्टची मासिक बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणावळ्याजवळील एकवीरादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. सोमवार, दिनांक 7 जुलै २०२५ पासून आई एकवीरा गडावर हा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
काय आहे खासदार सुरेश म्हात्रे यांचे ट्वीट?
आज एकवीरा देवस्थान ट्रस्टची मासिक मिटिंग ट्रस्टचे अध्यक्ष श्री. दिपकजी हुलावळे, उपाध्यक्ष, सचिव, सर्व ट्रस्टचे विश्वस्त आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत एकवीरा गडावरील भक्तधाममध्ये पार पडली. या बैठकीत सोमवार, दिनांक ७ जुलै २०२५ पासून आई एकवीरा गाडवरती दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे, असं ते म्हणालेत.
नक्की वाचा - Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
कसा असेल ड्रेसकोड?
1. महिला व मुलींसाठी: साडी, सलवार-कुर्ता, किंवा पारंपरिक भारतीय पोशाख असावा जेणेकरून पूर्ण अंग झाकलेले असावे.
2. पुरुष व मुलांसाठी:
धोतर, कुर्ता, पायजमा, पॅंट-शर्ट, टी-शर्ट घालावे जेणेकरून पूर्ण अंग झाकलेले असावे.
3. काय टाळावे:
शॉर्ट स्कर्ट, मिनी स्कर्ट, फाटकी जीन्स, वेस्टर्न कपडे, हाफ पँट, व अंगप्रदर्शन करणारे कपडे
दरम्यान, आई एकवीरा देवस्थानच्या पावित्र्याची जपणूक आणि भक्तीच्या वातावरणाची शिस्त राखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असून, सर्व भाविकांनी याला सहकार्य करावे, अशी नम्र विनंती आहे, असंही आई एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.