Drone ‘Postmen' to Deliver mails: घनदाट जंगल, हट्टी नद्या आणि पावसाळ्यात वाहून जाणारे रस्ते यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत टपाल सेवा पोहोचवणे हे टपाल कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान असते. जिथे चाके आणि होड्याही पोहोचू शकत नाहीत, तिथे आता 'ड्रोन' (Drone) हे संदेशवाहक म्हणून काम करणार आहेत. टपाल खात्याने (India Post) महाराष्ट्रातील या अतिदुर्गम भागांतील गावांसाठी ड्रोन-आधारित डिलिव्हरी सेवा सुरू करण्याची तयारी केली असून, यामुळे अनेक नागरिकांना मोठी जीवनरेखा मिळणार आहे.
माओवादग्रस्त भागातील 27 गावांची निवड:
चंद्रपूर डाकघर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. रामा कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची सुरुवात माओवादग्रस्त जिल्ह्यातील भामरागड, वैरागड आणि सिरोंचा या तालुक्यांमधील २७ गावांमध्ये केली जाणार आहे. या गावांमध्ये विखुरलेली आदिवासी लोकसंख्या आहे आणि पावसाळ्यामध्ये ही गावे अनेक आठवडे बाहेरच्या जगाशी पूर्णपणे तुटलेली राहतात.
'डी+०' डिलिव्हरीचे लक्ष्य:
टपाल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या गावांना जवळच्या शाखेच्या टपाल कार्यालयापासूनचे अंतर ८० किलोमीटरपर्यंत असू शकते. त्यामुळे एखादे महत्त्वाचे पत्र किंवा औषधे पोहोचवण्यासाठी अनेक दिवस लागतात. 'डी+०' (D+0) डिलिव्हरी (म्हणजे वस्तू त्याच दिवशी प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवणे) हे टपाल खात्याचे लक्ष्य आहे. पण, या भागांतील धोकादायक भूभाग आणि खराब कनेक्टिव्हिटीमुळे डिलिव्हरीला अनेकदा 'डी+२' (D+2) दिवस लागतात.
दिवाळीआधीच ग्राहकांचं 'दिवाळं' निघणार! सोन्या-चांदीचे दर पुन्हा कडाडले, 181000 रुपयांवर मारली मजल!
कर्जत-माथेरान यशस्वी ट्रायल:
मे महिन्यात झालेल्या यशस्वी चाचणीनंतर टपाल खात्याला ही कल्पना अधिक प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा मिळाली. कर्जत ते माथेरान या मार्गावर एका ड्रोनने ९ किलो वजनाचा पार्सल केवळ २० मिनिटांत पोहोचवला होता, जो रस्त्याने पूर्ण करण्यास सुमारे दोन तास लागतात. या यशस्वी चाचणीनंतर ऑगस्टमध्ये चंद्रपूर टपाल विभागाला प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आले.
त्यांनी २७ दुर्गम गावांचा पहिला समूह पायलट रोलआउटसाठी निश्चित केला आहे. या ड्रोन डिलिव्हरीमुळे वैद्यकीय किट्स, सरकारी कागदपत्रे, वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची सेवा अखंडित आणि वेळेवर पोहोचेल, असे या प्रकल्पाचे निरीक्षण करणारे दुसरे अधिकारी ललित बोरकर यांनी स्पष्ट केले आहे.