दुष्काळाचं संकट! जायकवाडीत उरले फक्त 6 टक्के पाणी 

मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
छ. संभाजीनगर:

मोसिन शेख 

मराठवाड्यातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याचा स्त्रोतच उरला नसल्याचे चित्र आहे. गावातील विहिरी आटल्या, बोअरवेलचे पाणी संपले, तर तलाव देखील कोरडीठाक पडली आहे. अशात प्रशासनाकडून पुरवले जाणाऱ्या टँकरच्या पाण्यावर तहान भागवली जात आहे. मराठवाड्याची तहान भागवणारा आणि आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात देखील फक्त 6.35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या वर्षी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावागावात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातही हे टँकर गावात आठ दिवसातून एकदा येतो. त्यामुळे आठ दिवसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू असते. जायकवाडी धरण असलेल्या पैठण तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक टँकर सुरू आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला असं म्हणण्याची वेळ धरण परिसरातील गावकऱ्यांवर आली आहे. पुढील आठवड्यात ही परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरण पाणीसाठा -16 मे 2024

जायकवाडी धरण पाणी पातळी - 1497.30 फूट

जायकवाडी धरण पाणी पातळी - 456.377 मीटर

एकूण पाणीसाठा दलघमी  -       875.92 दलघमी

हेही वाचा - खिचडी कमी वाढली, पतीचा संताप, थेट पत्नीचा केला खून

आठ दिवसांनी एकदा आंघोळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. पैठण तालुक्यातील अनेक गावात आठ दिवसांनी टँकर येतो. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्याची बचत करावी लागते. अब्दुलपूर तांडा येथील गावकरी तर चक्क आठ दिवसांनी एकदा आंघोळ करतात. पिण्यासाठी विकत पाणी घ्यावं लागतं. तर जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी नसल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं गावकरी सांगतात.

हेही वाचा - मोदींच्या सभेत गोंधळ, कांद्यावरून वांदा होणार? शरद पवार थेट बोलले

राज्यातही पाणी टंचाई 

राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावागावात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील 9 हजार 596 गावं आणि वाड्यांवर, तब्बल 3 हजार 417 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ज्यात सर्वाधिक टँकर मराठवाड्यात सुरू आहे. अनेक गावात तर आठ दिवसांनी एकदा टँकर येत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राची टँकरवाड्याच्या दिशेने वाटचाल पाहायला मिळत आहे.

Advertisement