भारताला जागतिक 'मॅन्युफॅक्चरिंग हब' बनवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरावे यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. आर्थिक सर्वेक्षण 2025-26 (Economic Survey) मध्ये महाराष्ट्रातील नाशिक शहराचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. नाशिकमधील सॅमसोनाइट (Samsonite) या प्रसिद्ध कंपनीची लगेज फॅक्टरी आता उत्पादनाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी फॅक्टरी ठरली आहे. विशेष म्हणजे, या भारतीय युनिटने युरोपमधील जुन्या आणि प्रस्थापित उत्पादन केंद्रांनाही मागे टाकले आहे.
या यशाचे गमक काय?
आर्थिक सर्वेक्षणात नाशिकच्या या यशाचे विश्लेषण करताना असे म्हटले आहे की, जेव्हा उत्पादनाचा मोठा आवाका (Large Scale), सक्षम सप्लाय चेन आणि कुशल कामगार याची सुयोग्य सांगड बसते, तेव्हा भारतीय उद्योग जागतिक स्तरावर काय क्रांती घडवू शकतात, याचे नाशिक हे जिवंत उदाहरण आहे. हे यश केवळ एका कंपनीचे नसून ते भारताच्या 'इंडस्ट्रियल क्लस्टर' (Industrial Cluster) धोरणाचे यश आहे.
क्लस्टर का महत्त्वाचे असतात?
सर्वेक्षणानुसार, आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही केवळ दोन उद्योगांमधली किंवा दोन कंपन्यांमधली नसते तर ती संपूर्ण औद्योगिक क्लस्टर्समध्ये असते. क्लस्टर म्हणजे अशी जागा जिथे कंपन्या, कच्चा माल पुरवणारे सप्लायर्स, मजूर आणि लॉजिस्टिक्स एकाच ठिकाणी उपलब्ध असतात. सॅमसोनाइटने नाशिकमध्ये केवळ फॅक्टरी उभारली नाही, तर तिथे सप्लायर्स आणि कुशल कामगारांचे एक मजबूत जाळे तयार केले आहे. यामुळे खर्चात कपात होऊन उत्पादकता वाढली.
चीन आणि व्हिएतनामचे उदाहरण
जागतिक स्तरावर क्लस्टर्सचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्वेक्षणात काही आकडेवारी सादर करण्यात आली आहे:
चीन- चीनचा 'ग्रेटर बे एरिया' हा देशाच्या जमिनीच्या 1% पेक्षाही कमी आहे, मात्र तो देशाच्या एकूण निर्यातीत 35% आणि जीडीपीमध्ये 11% वाटा उचलतो.
व्हिएतनाम- व्हिएतनाममधील दोन मुख्य आर्थिक क्षेत्रांनी केवळ 11% जमीन व्यापली असली, तरी देशाचा दोन-तृतीयांश व्यापार तिथूनच होतो.