मंगेश जोशी, जळगाव
भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंत्र्यांच्याच मुली सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? असा सवाल विचारला जात आहे. एकनाथ खडसे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देत, सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी व राजकारण्यांकडून असा गुंडाना संरक्षण मिळते, असा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ खडसे यांनी याबाबत म्हटलं की, "रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींच्या छेडछाडीचा प्रकार हा निंदनीय आहे. छेडछाड करणारे केवळ टवाळखोर नसून गुंड आहेत. मुलींची छेडखानी करणाऱ्या टवाळखोरांना अडवणाऱ्या पोलिसांनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणात पोलिसाने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. झालेली घटना केवळ माझ्या घरातील नसून हा एक सामाजिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत."
(नक्की वाचा- Big News : केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड, जळगावातील खळबळजनक घटना)
"मुक्ताईनगरमध्ये गेल्या तीन-चार वर्षात मोठ्या प्रमाणात गुंडागिरी वाढली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात यासंदर्भात अनेकदा मी आक्रमकपणे हा मुद्दा मांडला आहे. महिला अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने बांगड्या घातलेल्या आहेत का? अशा पद्धतीने विधान परिषदेत मी बोललो आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम हा होत नाही. कारण या गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधी व राजकारण्यांचा संरक्षण मिळते आहे", असं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.
(नक्की वाचा- हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ)
गुंडांना संरक्षण देण्यासंदर्भात पोलिसांना फोन यायचे
"मागील दोन-अडीच वर्षात मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांना संरक्षण देण्यासंदर्भात पोलिसांना फोन यायचे असं पोलिसांनीच मला सांगितलं. महाराष्ट्रात पोलीस यंत्रणांवर विश्वास राहिलेला नाही महिलांनी आता स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्याची गरज आहे, अशी आजची स्थिती आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलींच्या बाबतीतच कुणी एवढं धाडस करत असेल तर सर्वसामान्य मुलींचं काय?" असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला.