अक्षय कुडकेलवार, मुंबई: मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर महायुतीमध्ये आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी जोर- बैठकांचा सिलसिला सुरु आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेक नेते मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी चार महत्वाचे निकष ठरवले आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील कामगिरी, पक्षासाठी योगदान तसेच आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना मंत्रिपदे दिली जाणार आहेत.
काय आहेत चार निकष?
1. पक्ष वाढवण्यात योगदान देणाऱ्यांचा विचार मंत्रिपदं देताना केला जाईल. निवडणूक प्रचारात आमदारानं किती साथ दिली, ही बाब मंत्रिपद देताना विचारात घेतली जाईल.
2. प्रादेशिक आणि जातीय समीकरणांचा समतोल साधला जाणार
3. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्र्यांची निवड केली जाईल
4. परफॉर्मन्स हा मंत्रिपद देताना महत्वाचा मुद्दा असणार आहे. खासकरून हे निकष माजी मंत्री आणि आमदार यांना लावली जाणारी आहेत. त्यानुसार काही मंत्रिपदं फिरती ठेवली जाऊ शकतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदेंचे मिशन मुंबई!
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आगामी मुंबई पालिकांच्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पालिका निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे खासदार, आमदारांसह पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना मुंबई पालिकेवर भगवा भडकावण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल. त्या तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. पण मुंबई देशाचं पावर हाऊस झालं पाहिजे. मुंबई पालिकेत सुद्धा महायुतीचे सरकार असणे आवश्यक आहे. त्या तयारीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार यांची बैठक घेतली. यात चर्चा करण्यात आली, असे म्हणत मुंबईत भगवा भडकणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.