'विरोधक गडबडले, बिथरलेत! त्यांनी विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवावा'

रिपोर्टकार्ड देणारं हे आमचं पहीलं सरकार आहे. असं रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी डेअरिंग लागतं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

गेली सव्वा दोन वर्ष सरकारने कामाचा धडाका लावला आहे. जवळपास 900 निर्णय सरकारने घेतले आहेत. साठ ते सत्तर कॅबिनेट बैठका घेतल्या आहेत. सर्व सामान्यांसाठी योजना आणल्या आहेत. या कामाच्या धडाक्याचा धसका विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे ते सध्या गडबडलेले आहोत. ते बिथरले आहेत. त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे. त्यांना आता पराभव समोर दिसू लागला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारले आहे. विरोधकांवर टिका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही चिमटे काढले आहेत. महायुतीकडून गेल्या सव्वा दोन वर्षाच्या केलेल्या कामांचा लेखाजोखा रिपोर्टकार्डच्या माध्यमातून मांडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले उपस्थित होते. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.  मविआच्या अडीच वर्षात राज्य मागे गेले होते असा आरोप ही शिंदे यांनी केला. जर आमचं सरकार आलं नसतं, तर हे राज्य आणखी मागे गेले असते. आम्ही काम करणारे आहोत. आम्ही सर्व सामान्यांना न्याय देणारे  आहोत. लोकसभेला लोकांना फसवून जिंकले. पण आता जनता फसणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय सव्वा दोन वर्षात कामांचा धडाका लावला आहे. एकूण 900 निर्णय घेतले आहेत. त्यासाठी साठ ते सत्तर कॅबिनेट घेतल्या. या कामाच्या जोरावर हे लाडके सरकार ठरले आहे असेही शिंदे म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे दोन ठराव, निवडणुकीच्या तोंडावर वाद चव्हाट्यावर

विरोधक पोलखोल करणार म्हणून सांगत आहेत. सत्तेल आल्यास जेलमध्ये टाकणार असंही बोलत आहेत. युती सरकारच्या योजना बंद करणार असे जाहीर पणे सांगत आहेत. पण तुमची पोलखोल आधी झालीच आहे. त्यामुळे योजना बंद करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही. आता तर खुलेआम बोलत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला तर त्याचा  करेक्ट कार्यक्रमच झाला समजा असेही शिंदे यावेळी म्हणाले. ही योजना बंद करण्याचे लाडकी बहीण ऐकून घेणार नाही. आम्हाला बहीणींना लखपती बनवायचं आहे असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

ट्रेंडिंग बातमी - हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसणार, भाजपने फासे टाकले, बडा नेता गळाला

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक योजना या बंद पडल्या होत्या. मेट्रोच्या कारशेडचेही काम बंद पाडले. बालहट्टामुळे ते काम बंद होतं. त्याला त्यावेळीच्या सरकारचा अहंकार नडला. त्यामुळे सतरा हजार कोटीची जास्त खर्च झाला. तो जर वाचला असता तर लाडक्या बहीणीसाठी आम्हाला आणखी जास्त पैसे देता आले असते असे शिंदे यावेळी म्हणाले. सरकारने उद्योग, शेतकरी, तरूण, महिला, जेष्ठ नागरीक अशा समाजातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणल्या आहेत. त्याचा ते लाभ घेत आहेत. त्यामुळे विरोधकांना आता पराभव तोंडा समोर दिसत आहे असे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - मविआतला मुंबईतल्या 'त्या' जागांवरचा तिढा सुटला, ठाकरेंच्या पारड्यात कोणती जागा?

महायुतीच्या रिपोर्ट कार्डात एकही शब्द खोटा लिहीला नाही. जनतेने आघाडी आणि युती सरकारच्या कामाची तुलना करावी. कमी कालावधीत आम्ही जास्त कामं केली आहेत . असं असताना विरोधक हे  राज्याची बदनामी करत आहेत. एक जण देशाची बदनामी परदेशात करत आहेत. असे राहुल गांधी यांचे नाव न घेता शिंदे यांनी टिका केली. विरोधी पक्षाने विरोध करावा. पण विरोधाला विरोध करू नये असंही ते म्हणाले. आम्ही कामाच्या जोरावर पुन्हा सत्तेत येवू असं ही ते म्हणाले.  आम्ही केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला जनता दिल्या शिवाय राहाणार नाही. रिपोर्टकार्ड देणारं हे आमचं पहीलं सरकार आहे. असं रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी डेअरिंग लागतं. त्यासाठी काम करावं लागतं. आपलं सरकार आता लाडकं सरकार झालंय. ही मोठी पोच पावती आहे असे शेवटी शिंदे म्हणाले.