संजय तिवारी, प्रतिनिधी
आपण जर पुढील काही दिवस विदर्भातील (Gadchiroli elephants) मेळघाट किंवा गडचिरोली येथे पर्यटनासाठी जाणार असाल तर तिथे आपल्याला हत्ती न दिसण्याची शक्यता जास्त आहे. कारण, महाराष्ट्रातील एकमेव असलेला गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथील शासकीय ‘हत्ती कॅम्प' मधील नऊ हत्तींना सोमवार 20 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत वैद्यकीय रजेवर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे आता ‘हत्ती कॅम्प' दहा दिवस बंद राहणार आहे. दुसरीकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत कोळकास येथील हत्तींना 10 जानेवारी ते 25 जानेवारी अशा 15 दिवसांच्या वैद्यकीय सुट्टीवर पाठवण्यात आलं असून या काळात हत्ती सफारी बंद असेल. मेळघाटातील हत्ती सफारी 26 जानेवारीपासून पूर्ववत सुरू होणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
हत्तींसाठी हा वार्षिक विशेष वैद्यकीय रजेचा काल असतो. जानेवारीच्या थंडीत त्यांच्या पायांना भेगा पडू नये यासाठी त्यांच्या पायांवर विशेष उपचार केले जाते. ज्याला चोपिंग असे म्हणतात. याशिवाय त्यांची वैद्यकीय तपासणी आणि रक्त तपासणी सुद्धा केली जाते. या हिवाळी सुट्टीनंतर हे हत्ती पुन्हा पर्यटकांना भेटू शकतील.
नक्की वाचा - Agashi library: 111 वर्षाचा समृद्ध इतिहास! 18 व्या शतकापासूनची दुर्मीळ पुस्तकं असलेलं आगाशी वाचनालय
चोपिंगमध्ये हत्तींच्या पायांना 40 ते 45 औषधी वनस्पतींचं मिश्रण लावण्यात येतं. दहा दिवस हत्ती डॉक्टरांच्या देखरेखी खाली असतात. त्यांच्या पायांना अधिकाधिक विश्रांती मिळावी असा उद्देश असल्याने त्यांना फारशी हालचाल करू दिलं जात नाही. शिवाय त्यांना कुठलंही काम करू दिलं जात नाही. याशिवाय, त्यांच्या प्रकृती संदर्भातील तपासणी, रक्त चाचणी वगैरे केल्या जातात.