राहुल तपासे, प्रतिनिधी
Emotional Father-Son Reunion in Karad Lok Adalat : चार वर्षांपासून एकमेकांकडे पाठ फिरवलेले बाप-लेक कराडमधील लोकन्यायालयात एकत्र आले आणि कोर्टाचा परिसर गहिवरून गेला. मुलाने वडिलांच्या पाया पडून चूक मान्य केली, तर वडिलांनीही 'माझंही चुकलं' म्हणत मुलाला प्रेमाने जवळ घेतलं. हे भावनिक दृश्य पाहून न्यायाधीश, वकील आणि इतर उपस्थितांचे डोळे पाणावले.
काय आहे प्रकरण?
सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील बाप-बेट्यांची ही गोष्ट आहे. पाटण तालुक्यातील जाधववाडी येथील सुदाम वेंकट जाधव आणि त्यांचा मुलगा राजेश सुदाम जाधव यांच्यातील दुरावा टोकाला गेला होता. त्यांनी विरोधात अनेक फौजदारी आणि चेक बाऊन्सची प्रकरणं दाखल झाली होती. मात्र, लोकन्यायालयातील न्यायाधीश आणि वकील आर. पी. गांधी, ओंकार पाटील आणि दीपक पवार यांच्या मध्यस्थीमुळे हे दोघे पुन्हा एकत्र आले. या दोघांनीही एकमेकांच्या विरोधातील फौजदारी आणि दिवाणी खटले मागे घेतले. एका क्षणात चार वर्षांचा दुरावा संपला आणि रक्ताच्या नात्याची वीण पुन्हा घट्ट झाली.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. जोशी आणि दिलीप भा. पतंगे यांच्या नेतृत्वाखाली हे लोकन्यायालय यशस्वी झालं. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. दीपक थोरात आणि सर्व सदस्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. तोडकर, एस. डी. कुरेकर, पी. एल. घुले, के. आर. खोंद्रे, श्रीमती जे. जे. माने, एस. एम. बोमिडवार, श्रीमती पी. एस. भोसले, श्रीमती ए. व्ही. मोहिते, पी. पी. कुलकर्णी आणि अतुल ए. उत्पात यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांच्या सहभागामुळे या उपक्रमाला मोठं यश मिळालं.
लोकन्यायालयाची जादू!
या लोकन्यायालयात एकूण 6,18,00,000 रुपयांच्या तडजोडी झाल्या. यामध्ये फौजदारी, दिवाणी, अपघात प्राधिकरण आणि चेक बाऊन्सच्या प्रकरणांचा समावेश होता. लोकन्यायालयात ठेवलेल्या एकूण 3,310 प्रकरणांपैकी 496 प्रकरणं सामंजस्याने मिटली, तर जवळपास 200 प्रकरणं वादपूर्व टप्प्यातच निकाली काढण्यात आली. एकूण 696 प्रकरणांवर तोडगा निघाल्यामुळे पक्षकारांचा न्यायालयीन खर्च वाचला आणि तुटलेली कौटुंबिक आणि सामाजिक नाती पुन्हा जुळली.
केवळ लाखो रुपयांच्या तडजोडीपुरतं मर्यादित न राहता, हे लोकन्यायालय तुटलेली नाती पुन्हा जुळवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम ठरलं, ज्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायाची भावना जपली गेली, अशी भावना या निमित्तानं व्यक्त होत आहे.