महाराष्ट्रात गेल्या 3-4 दिवसात अनाकलनीय घडामोडी घडल्या आहेत. 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीमध्ये विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. 29 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर तातडीने उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावण्यासाठी अजित पवारांचे निकटवर्तीय सरसावले होते. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवारांची विधीमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. अजित पवारांची खुर्ची आता त्यांची पत्नी चालवणार हे स्पष्ट झालं. आतापर्यंत अजित पवारांच्या पत्नी, त्यांच्या पश्चात कुटुंब सांभाळणारी एक महिला, अशीच ओळख सुनेत्रा पवारांची देशाला होती. मात्र सुनेत्रा पवारांना लहानपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं असून त्या कच्चा खेळाडू अजिबात नाहीयेत.
नक्की वाचा: सुनेत्रा पवारांकडं उपमुख्यमंत्रिपद, पण अजित पवारांचं 'पॉवरफुल' मंत्रालय कापलं
1. 'तेर'मध्ये जन्म, भाऊ बडा राजकारणी
सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिव (तत्कालीन उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेर या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गावात झाला आहे. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक होते, तर त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे राज्याचे माजी मंत्री आणि दिग्गज नेते आहेत. काँग्रेसपासून वेगळे होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. तेव्हाच्या शरद पवारांच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये पद्मसिंह पाटील यांचाही समावेश होता. सुनेत्रा यांच्या माहेरी म्हणजेच तेरमधील त्यांना जवळून पाहणाऱ्यांनी म्हटले की, "त्या कणखर, समंजस आहेत. सगळ्यांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या आहेत. त्या अत्यंत शिस्तीच्या आहेत. त्यांचं शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे तेरच्या महाराष्ट्र संत विद्यालय इथे झालं. त्यानंतरच्या शिक्षणासाठी त्या संभाजीनगरला गेल्या, हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी शिक्षण घेतलं. त्याचे वडील 'तेर'चे पाटील होते, त्यांच्याकडे 300-400 एकर जमीन होती. त्यांचे भाऊ पद्मसिंह पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, बांधकाम आरोग्य सभापती झाले नंतर आमदार झाले. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले आहे. 1985 साली त्यांचं लग्न अजित पवारांशी झाले, पवार कुटुंबात गेल्यानंतर त्यांना आणखी राजकीय वारसा लाभला.
आपल्या बहिणीचे लग्न पवार कुटुंबात व्हावे यासाठी पद्मसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला होता. 1985 साली अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा विवाह झाला. त्यांना 'पार्थ' आणि 'जय' ही दोन मुले आहेत
Photo Credit: PTI
2. पर्यावरण आणि स्वच्छता उपक्रमातील मोठे नाव
सुनेत्रा पवारांना लहानपणापासून बघितलेल्या अन्य एकाने म्हटले की, "अजित पवारांसारख्याच सुनेत्रा पवार या शिस्तीच्या आणि कणखर आहेत."जरी त्या सक्रिय राजकारणात नव्हत्या, तरीही त्यांनी आपला लोकसंपर्क सामाजिक कार्यातून वाढवला. साताऱ्याचे पालकमंत्री असताना अजित पवारांनी त्यांना महाबळेश्वरला जाताना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे काम सुरू असलेले एक गाव दाखवले. त्या एका घटनेने सुनेत्रा पवारांचे आयुष्य बदलले. त्यांनी आपल्या मूळ सासरी म्हणजेच काटेवाडीतून सामाजिक कार्याला सुरुवात केली.काटेवाडीत सुरुवातीला 80 टक्के लोकांकडे शौचालयांची सोय नव्हती. सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेऊन निर्मलग्राम मोहीम राबवली आणि केवळ काटेवाडीच नव्हे, तर राज्यातील 86 गावांमध्ये हे अभियान पोहोचवले. काटेवाडीला 'इको व्हिलेज' बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासोबतच बारामतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी 'प्रोजेक्ट मेघदूत' राबवला, ज्यामुळे परिसर टँकरमुक्त होण्यास मदत झाली. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी बारामतीमध्ये 'टेक्सटाईल पार्क'ची उभारणी केली. आज सुमारे 15 हजार महिला तिथे काम करून स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 2006 पासून त्या या पार्कच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच, बारामतीतील नामांकित 'विद्या प्रतिष्ठान' या संस्थेच्या विश्वस्त म्हणून काम पाहातात.
अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित होते. त्यांनी सुनेत्रा पवारांचे सांत्वन केले.
Photo Credit: PTI
3. राजकारणातील प्रवेश आणि 'पॉवर' गेम
2024 ची लोकसभा निवडणूक हा सुनेत्रा पवार यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांची नणंद सुप्रिया सुळे या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. बारामतीने पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुकीत पवार विरूद्ध पवार असा संघर्ष पाहिला होता. कारण ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर झाली होती. नणंद-भावजयीतली ही राजकीय लढाई संपूर्ण देशातील लक्ष्यवेधी लढतींपैकी एक होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि त्या देशाच्या संसदेत पोहोचल्या.