Exclusive : मुंडे, कराड, गुंडाराज अन् लाल डायरी... सुरेश धस एवढे आक्रमक का झाले?

Suresh Dhas Exclusive Interview : बीडमधील गुन्हेगारीवर बोलताना धस यांनीा म्हटलं की, बीड जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 12-15 हत्या झाल्या आहेत. अनेक हत्या रेकॉर्डवरही नाहीत. अनेकांनी घाबरून तक्रारीच केल्या नाहीत.

जाहिरात
Read Time: 5 mins

राहुल कुलकर्णी, NDTV मराठी

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. बीडमध्ये सुरु असलेल्या गुंडाराजवर सुरेश धस सडकून टीका करत आहेत. मंत्री धनंजय मुंडे हे सुरेश धस यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसत आहे. बीडमध्ये सुरु असलेल्या गुन्हेगारी घटनांसह विविध विषयांवर सुरेश धस यांनी 'एनडीटीव्ही मराठी'सोबत एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं मूळ हे पवनचक्की प्रकल्पावर झालेला किरकोळ वाद आहे. पवनचक्की प्रकल्पातील कंपनीकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप करताना सुरेश धस यांनी म्हटलं की,  विंड पॉवर एनर्जी  2011-12 मध्ये रिन्यू पॉवर एनर्जी कंपनीच्या माध्यमातून आष्टीमध्ये पहिल्यांदा आली. त्यांनी 300 ते 600 मेगावॅटचं काम देखील केलं. त्यानंतर दुसरी कंपनी आली. मात्र आमच्याकडे कुठला धांगडधिंगा झाला नाही. आम्हाला एवढे द्या, तेव्हढे त्या असं आमच्याकडे काही झालं नाही. आता ज्या नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत, त्या आमच्याकडे झाल्या नाहीत. 'आकां'च्या कानावर घालूनचं हे सर्व सुरु आहे. त्यामुळे मोठ्या 'आकां'नी मंत्रिपद, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पॉवर ऑफ अॅटर्नी दिल्यासारखे वाल्मिकी कराडला दिले होते, अशी टीका सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केली. 

Advertisement

बीडमधील अनेक हत्या रेकॉर्डवरही नाहीत

बीडमधील गुन्हेगारीवर बोलताना धस यांनी म्हटलं की, बीड जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 12-15 हत्या झाल्या आहेत. अनेक हत्या रेकॉर्डवरही नाहीत. अनेकांनी घाबरून तक्रारीच केल्या नाहीत. अनेक लोक गायब झालेले आहेत. भीतीपोटी कुणीही समोर येणार नाही. मात्र हळूहळू अनेक कुटुंब समोर येतील आणि या सर्वाला वाचा फोडतील. यांची माणसं पीडितांच्या घरी जाऊन कुटुंबियांना धमक्या देतात. अनेक करुण कहाण्या आहेत, जे ऐकवणार देखील नाहीत.     

Advertisement

जातीय राजकारणावर सुरेश धस यांनी म्हटलं की, माझ्या आयुष्यात अजूनतरी जात हा फॅक्टर शिवलेला नाही. माझ्यासोबत वंजारी समाजातील माणसे देखील आहेत. वंजारी समाजातील कोणत्या माणसांना यांनी केलेलं दुष्कृत्य पटलं आहे. यांच्याकडून ज्यांना फायदा झालाय त्या मोजक्या लोकांना यांची साथ आहे. शांतीवनचे दीपककाका नागरगोजे हे देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला गेले. त्यांनी तेथे अश्रू ढाळले. त्यामुळे वंजारी समाजात मन असलेली माणसे नाहीत का? जीवाचीवाडीसह नांदूरगावच्या अनेक वाड्यांतील लोक मस्साजोगमध्ये गेले होते. वंजारी समाज भावनिक आणि रागीट आहे. त्यामुळे त्यांना पेटवलं की तो समाज पेटतो, याचा गैरफायदा हे घेतात. 

Advertisement

निवडणुकीच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचे आरोप सुरेश धस यांच्यावर होत आहेत. याला उत्तर देताना सुरेश धस यांनी म्हटलं की, त्यांनी याबाबत कोर्टात जावं. माझी आमदारकी त्यांनी घालवावी. माझे कागदपत्र मिळत नसतील तर मीच त्यांना देतो. देवस्थानांच्या जमीन घोटाळ्यांच्या आरोपांवरवरही सुरेश धस सविस्तर बोलले. मी जमिनी हडप केल्या, गडप केल्या की नाही ते सगळं क्लिअर झालं. त्या जमिनींशी माझा काहीही संबंध नव्हता. धनंजय मुंडे आणि कंपनी यांनी ही माहिती दिली. 93 प्रकरणे दाखवणे, हायकोर्टात दाखवणे असं सगळं केलं. एका उपअधीक्षक लेव्हलची चौकशी लावली. मात्र त्यातही काहीच निष्पन्न झालं नाही. एसआयटी चौकशी लावली. कुमावत नावाच्या अधिकाऱ्याने चौकशी केली, मात्र काहीही निघालं नाही. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात अनेकांवर गुन्हे दाखल झाले, त्यात आम्हीही होतो. 

फडणवीस दत्तासारखे मागे उभे राहिले 

देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर जीव आहे. त्या माणसाने मला जगवलं. माझ्यावर ज्यावेळी घोटाळ्याचे आरोप झाले, त्यावेळी माझ्यामागे ते दत्त म्हणून उभे राहिले. अजित पवारांसोबतच्या बैठकीबाबत बोलताना धस यांनी म्हटलं की, अजित पवारांसोबत देखील मी काम केलं. मात्र त्यांना सोडल्यानंतर ते माझे मार्गदर्शक कसे होतील. अजित पवार राजकारणापुरते मर्यादित नाहीत. 

धनंजय मुंडे देखील भविष्यात आरोपी होतील

धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठीच्या बैठका झाल्या. 14 जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर 19 जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या सगळ्याचे सीडीआर सापडतील. या प्रकरणात धनंजय मुंडे देखील भविष्यात आरोपी होतील. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची कडी धनंजय मुंडेपर्यंत जाणार नाही असे मी कालपर्यंत मी म्हणत नव्हतो, मात्र आज मी ठामपणे म्हणत आहे. 

धनंजय मुंडे व्यक्ती म्हणून समोर दाखवताना चांगली आहे. मात्र राजकारणात ते शब्द कुणाचाच पाळत नाही. त्यांची ही पद्धत आहे ती चुकीची आहे. धनंजय मुंडेंच्या सगळे विरोधात असताना मी त्यांच्यासोबत होतो. धनंजय मुंडे गेल्या 5 वर्षांत अधिक बिघडले आहेत.  वाल्मिक कराडकडे पॉवर ऑफ अॅटर्नी दिल्यापासून ते फार बदलले.  वाल्मिक कराडची 2 हजार कोटींची संपत्ती असावी. हडपसरच्या अमानोरा पार्कमध्ये संपूर्ण माळा त्याच्या ड्राव्हरच्या नावावर आहे. यावरून कराडची संपत्ती किती असावी हे कळतं.  वाल्मीक कराड धनंजय मुंडेंबाबत प्रामाणिक आहे. 

त्या सर्वांवर 302 चे गुन्हे दाखल झाले पाहिजे

संतोष देशमुखचे क्रूरपणे हत्या केली. त्याला नेऊन थोडं मारलं असत तरी चाललं असतं. त्याला चौकात नेऊन मारहाण केली असती तरी चाललं असतं. नंतर सोडून द्यायला हवं होतं, किमान संतोष दिसला असता. त्या लेकराची चूक काय? त्याला रिंगण करुन मारलं. व्हिडीओ कॉल करुन त्याला मारलं. ज्यांनी ज्यांनी व्हिडीओ कॉल पाहिला त्या सर्वांवर 302 चे गुन्हे दाखल झाले पाहिजे. सगळ्यांवर मोक्का लागला पाहिजे. इथे बरेच मोक्के झाले पाहिजे. राखेचा मोक्का लागला पाहिजे,  वाळूचा मोक्का, खडी चोरणाऱ्यांवर मोक्का, कंपन्यांवर दादागिरी करणाऱ्यावर मोक्का लागला पाहिजे, अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली. 

मलाही अनेक धमक्या आल्या. चार-दोन फोन आले. मात्र नंतर माफीही मागितली. संध्याकाळी धमक्या देतात, दुसऱ्या दिवशी माफी मागतात. माझ्याबाबत तरी असं घडतंय, अंजलीताईंबाबत काय माहिती नाही. मला पोलीस संरक्षणाची गरज नाही. कुणाला घाबरायचं कारण नाही. माझी मुलेही घाबरत नाही. 

झंटा फंटा करेल त्याला अंटा फंटा करु

बीडचं पालकमंत्रिपद देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलं पाहिजे. बीडची प्रगती झाली पाहिजे, बीजमध्ये गुंतवणूक आली पाहिजे, बीडच्या ऊसतोड्यांचा प्रश्न मिटला पाहिजे. बीडमधील नागरिक आरामशीर जगले पाहिजे. बीडमधील दहशत मिटली पाहिजे. कुणाच्या दहशतीखाली कुणी जगलं नाही पाहिजे. झंटा फंटा करेल त्याला अंटा फंटा करु. जर कुणी दहशत माजवली तर त्याला दहशतीनेच उत्तर दिलं जाईल. त्यांच्याकडे जशी लोकं आहे आहेत, तशी आमच्याकडे देखील लोक आहेत, असा इशाराच सुरेश धस यांनी दादागिरी करणाऱ्यांना दिला आहे.