शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूरकरांनी भूमिका कायम ठेवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देखील अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारच्या या ड्रीम प्रोजेक्टला विरोध केला. शेतात तिरंगे झळकवून शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घालू नये अशी भूमिका ठेवली. शक्तीपीठ महामार्गातून स्वातंत्र्य मिळावं हीच मागणी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ठेवली. राज्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या स्वातंत्र्यदिनी या आंदोलनाची तीव्रता पाहायला मिळाली. राज्यातील 12 जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधात आज 15 ऑगस्टला अभिनव आंदोलन करण्यात आले. ज्या शेतातून शक्तीपीठ जात आहे, त्या शेतात तिरंगा झेंडा लावून शक्तीपीठ महामार्ग आम्हाला नकोच, असा संदेश सरकारला देण्यासाठी हे आंदोलन होतं. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 12 जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातून शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गापासून स्वातंत्र्य मिळावं अशी भूमिका ठेवण्यात आलेली.
राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्यावतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी केलेलं हे आंदोलन होतं. या आंदोलनात एक टॅगलाईन वापरण्यात आलेली. “तिरंगा आमच्या वावरात, शक्तीपीठ नको शिवारात" अशी टॅगलाईन आंदोलनाची होती. शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, त्या शिवारात तिरंगा झेंडा ऊभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अशी मागणी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पाऊस असताना देखील शेतकऱ्यांनी ही निदर्शने ठेवली होती. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील कोगील बुद्रुक, कागल तालुक्यातील एकोंडी, भुदरगड मधील आकुर्डी, शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव आणि हातकणंगले मधील साजणी या गावांमध्ये हे आंदोलन झाले.
नक्की वाचा - EVM मधला निकाल बदलला, जिंकलेला हरला आणि हरलेला जिंकला
काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कोगील बुद्रुक येथे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शक्तीपीठ महामार्ग विरोधी समिती समन्वयक गिरीश फोंडे यांनी निमशिरगांव आणि साजणी (ता. शिरोळ आणि ता. हातकंणगले) आणि एकोंडी (ता. भुदरगड) येथील शिवारात हे आंदोलन केले. जिल्ह्यात पाचही ठिकाणी झालेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतरही काही संघटना सहभागी झाल्या. चारही गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनी शक्तीपीठ महामार्गापासून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे असं यावेळी सतेज पाटील म्हणाले. यासाठी शेतातच तिरंगा लावून हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या वावरात नको हे सरकारला ठणकावून सांगत आहोत. 86 हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग आता 1 लाख 6 हजार कोटींवर गेला आहे. सरकार हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही तो होऊ देणार नाही. या बदल्यात राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत त्या ठिकाणी रस्ते करा शेतकऱ्याला कर्जमाफी द्या, अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी मांडली. देशातील पिकाऊ जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. अशा काळात जमीन वाचणवे काळाची गरज असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्गा विरोधात उभे राहून आपण खऱ्या अर्थाने जमिनीला स्वातंत्र्य करत आहोत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी शेतामध्येच मेळावे घेऊन या महामार्गाविरोधात लढा उभारुया, असे ते म्हणाले.
रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग अस्तिवात असताना व तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून 50 हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जात आहे असा आरोप शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे समन्वयक गिरीश फोंडे बोलताना म्हणाले, देशातील सामान्य नागरीकांच्यावर कराचा व टोलचा बोजा टाकून मोदी -फडणवीस सरकारने बेजार केले आहे. देशातील शेतकऱ्यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकविण्याची ताकद आहे. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी वज्रमुठ केली असून हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.