- गोवा ते दिल्ली विमान प्रवासात एका अमेरिकन तरुणीला अचानक श्वासोच्छवास त्रास झाला ती बेशुद्ध पडली होती
- विमानात असलेल्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशन सुरू केले
- डॉ. अंजली निंबाळकर यांनी या तरुणीचे प्राण वाचवले
विशाल पुजारी
नशिबात जे असतं ते होतं असं म्हणतात. नशिबापुढे काही नसतं. जे नशिहात लिहीलं आहे ते त्या त्या वेळी नक्की होणार. मग तो मृत्यू जरी असला तरी तो त्याच वेळी होणार ज्या वेळी तो नशिबात आहे. त्याचा प्रत्यय एका विमान प्रवासात आला. ही घटना गोवा दिल्ली विमान प्रवास दरम्यान घडली. एका अमेरिकन तरुणीने इथं मृत्यूला मात दिली. पण त्यासाठी धावून आल्या त्या काँग्रेसच्या नेत्या डॉ. अंजली निंबाळकर. त्या खऱ्या अर्थाने या अमेरिकन तरुणीसाठी देवदूत ठरल्या. हा थरारक अनुभव विमानात असलेल्या प्रत्येक प्रवाशाने अनुभवला अन् अखेर सुटकेचा निश्वास सोडला.
गोवा ते नवी दिल्ली या विमानातून एक अमेरिकन युवती प्रवास करत होती. विमानाने उड्डाण केले. त्याच वेळी या अमेरिकन तरुणीला अचानक थंडी वाजू लागली. त्यात तिला श्वासोच्छवास घेण्यास त्रास होवू लागला. हा त्रास इतका वाढली की ती विमानातच बेशुद्ध पडली. अशा स्थितीत काय करावे कोणालाच समजले नाही. विमानात धावपळ उडाली. त्याच वेळी या विमानात काँग्रेस नेत्या आणी माजी आमदार अंजली निंबाळकर या प्रवास करत होत्या. अंजली या डॉक्टर आहेत. त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजले.
त्यांनी वेळ न दवडता त्या अमेरिकन युवतीच्या मदतीला धावल्या. ज्या वेळी डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी त्या तरुणीला तपासले त्यावेळी तिची नाडी थांबली होती. तिच्या ह्रदयाचे ठोके ही कमी झाले होते. अशा गंभीर क्षणी डॉ.अंजली निंबाळकर यांनी सर्व सुत्र हाती घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संबंधित युवतीला कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशनने (CPR) सुरू केले. त्याचा परिणाम ही लगेचच दिसून आला. सर्वच जण हा चमत्कार पाहात राहीले.
कार्डिओ-पल्मनरी रिससिटेशनने त्या तरुणीचे बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले. युवतीला शुद्ध आली. मात्र अर्ध्या तासानंतर ती युवती पुन्हा कोसळली. त्यावेळी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. पण सतर्क असलेल्या डॉ. अंजली यांनी योग्य वैद्यकीय उपचार करत त्या युवतीला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणले. त्यांच्या कृतीचे सर्वांनीच कौतूक केले. शिवाय त्या अमेरिकन तरुणीचा जीव ही वाचला. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला. डॉ. अंजली या काँग्रेसच्या माजी आमदार आहेत. त्या कर्नाटकातील खानापूर मतदार संघातून निवडून आल्या होत्या.