Julio Ribeiro on Ajit Pawar:
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक, 'सुपर कॉप' म्हणून परिचित असलेल्या माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. रिबेरो हे अनेक विषयांवर आपली मते परखडपणे मांडत असतात. अजित पवारांनी आपले कर्तव्य बजावत असताना आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. अंजना कृष्णा करत असलेली कारवाई रोखण्यास सांगत अजित पवारांनी सरळ सरळ या महिला अधिकाऱ्याला धमकावले होते. सदर प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबल उडाली असून या प्रकरणामुळे अजित पवारांनी आपल्यावर नामुष्की ओढावून घेतली आहे.मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना रिबेरो यांनी म्हटले की, हे प्रकरण केवळ अजित पवारांसाठीच नाही, तर महाराष्ट्रातील सर्व मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी एक धडा आहे.
'कायद्याचे पालन करणे हे सगळ्यांनाच बंधनकारक'
माजी पोलीस अधिकारी डी. शिवानंदन यांच्या 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान रिबेरो यांनी आपली मत मांडली. त्यांनी म्हटले की, "आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा ह्या केवळ सरकारच्या नियमांनुसारच काम करत होत्या. जर मंत्र्यांना हे कायदे मान्य नसतील, तर ते बदलण्याचा अधिकार सरकारला आहे. कायद्याचे पालन करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याला अशाप्रकारे धमकावणे हे अत्यंत निंदनीय आहे", पंजाबमध्ये पोलीस महासंचालक म्हणून काम करत असताना ज्युलिओ रिबेरो यांनी अत्यंत धडाकेबाज कामगिरी केली होती. तिथल्या दहशतवादाचा बीमोड अत्यंत आक्रमक पद्धतीने केल्याने त्यांना सुपर कॉप म्हणून ओळखले जाते.
वाद नेमका काय आहे?
सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे हा वाद पेटला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार आणि सोलापुरच्या करमाळा येथील पोलीस उपअधीक्षक (DSP) अंजना कृष्णा यांच्यात फोनवर संभाषण सुरू असल्याचे ऐकू येत आहे. व्हिडिओमध्ये अजित पवार अंजना कृष्णा यांना, "मी उपमुख्यमंत्री बोलतोय, ही ॲक्शन थांबवा. तुमची हिंमत कशी झाली?" अशा धमकावल्याच्या स्वरात बोलताना ऐकू येता आहेत. अंजना कृष्णा यांनी फोनवर बोलत असताना आपला आवाज न ओळखल्याने अजित पवार यांचा संताप झाल्याचेही या व्हिडीओतून दिसून आले आहे.
कोण आहेत अंजना कृष्णा ?
अंजना कृष्णा या 2022-23 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची सचोटी आणि कर्तव्यनिष्ठेची चर्चा महाराष्ट्रात सध्या जोर धरत आहे. या प्रकरणानंतर विरोधी पक्षांनी अजित पवारांवर टीका केली आहे. सध्या या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर धमकावल्याप्रकरणी आता रिबेरो यांनीही अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना रिबेरो यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण केवळ अजित पवारांसाठीच नाही, तर महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांसाठी एक धडा आहे.