मनिष रक्षमवार
नक्षलवाद संपवण्याचा दावा केला जात आहे. असं असतानाच गडचिरोलीत मात्र पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पुन्हा एकदा माओवादी हालचाली समोर आल्या आहेत. तालुका मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावरील हिदूर-दोबूर मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी बॅनर आणि पत्रके लावली आहे. त्यात त्यांनी 26 ते 30 जुलैदरम्यान गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. ही पत्रके आणि बॅनर झळकल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण आहे.
या पत्रकांची माहिती पोलीसांना देण्यात आली. या घटनेनंतर परिसरात पोलीस दलाने सतर्कता वाढवली आहे. भामरागड तालुक्यातील हिदूर-दोबूर मुख्य रस्त्यावर माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर आणि पत्रके टाकल्याची घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसात या भागात नक्षलवाद्यांना पायबंद घालण्यात यश आले होते. त्यांच्या हालचाली ही मंदावल्या होत्या. या भागातील नक्षलवाद्याचं कंबरडे मोडले होते. एके काळी हा नक्षलींचा गड समजला जात होता. पण आता पुन्हा या भागात त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
त्यांनी वाटलेल्या पत्रकांमध्ये 26 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत गडचिरोली जिल्हा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जल, जंगल आणि जमिनीच्या प्रश्नावर संघर्ष करताना अनेक सहकारी शहीद झाले. असं या पत्रकात म्हटलं आहे. त्यांचा हा त्याग आणि स्मरणासाठी हा बंद पाळण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी या पत्रकाच्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यात वाढणाऱ्या कंपन्या, पोलीस ठाण्यांची संख्या आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाचा मुद्दा या पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे.
शिवाय नागरिकांनी जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षणासाठी एकत्र यावे, असेही पत्रकांमध्ये म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. बॅनर आणि पत्रके जप्त करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, माओवादी बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.