पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याला मटण बिर्याणी खाऊ घालणे पुणे पोलिसांच्या चांगलच अंगलट आलं आहे. मारणेला बिर्याणी देणारे पुणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. त्याच बरोबर गजा मारणे टोळीतील तिघांवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्याच्या कोथरूड परिसरात 24 फेब्रुवारी रोजी गजानन मारणे आणि त्याच्या टोळीने एका आयटी इंजिनिअरला मारहाण केली होती. या प्रकरणात मकोकानुसार कारवाई करण्यात आली होती. गजाला 3 मार्च रोजी येरवडा कारागृहातून सांगली येथील कारागृहात स्थलांतरित करण्यात येत होते. तेव्हा काही पोलीस कर्मचारी एका ढाब्यावर जेवले. त्यांनी गजालाही मटण बिर्याणी खायला दिली. त्यावेळी पोलीस व्हॅनच्या मागे आणि पुढे गजा मारणेचे जवळपास 80 ते 100 साथीदार वेगवेगळ्या आलिशान गाड्यातून पाठलाग करत होते.
त्यांनी गजा मारणेशी संवाद साधल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकेशनची माहिती देत या गुंडांना पोलिसांच्या गाडीसोबत येण्याची परवानगीही दिली. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू यांच्यासह गजा मारणे टोळीचे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही घटना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना कळली.
नक्की वाचा - Jalna Crime: भररस्त्यात गाठलं, पुतण्याने काकासह मुलाला संपवलं; दुहेरी हत्याकांडाने जालना हादरलं
कोण आहे गजा मारणे?
पुण्याच्या गुन्हेगारी जगतातील मोठे नाव म्हणजे गजानन मारणे. पुण्याचे मालक, महाराज अशा अनेक नावांनी तो प्रसिद्ध आहे. पुणे शहरातील कोथरुड भागात गजानन मारणे आणि मारणे टोळीची मोठी दहशत आहे. मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारांपासून गजानन मारणे गुन्हेगारी जगतात आला. जमीन मालक आणि बिल्डर यांच्यामधील दुवा म्हणून गजा मारणे काम करु लागला. त्याच्यासोबत निलेश घायवळ हे नाव सुद्धा कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाले.
कोथरुड भागात दहशत अन् गँगवॉर...
जमीन व्यवहारातील दलाली आणि खंडण्यामधून गजा मारणे आणि गणेश घायवळने अवैध पैसा कमावला आणि बघता बघता कुख्यात गुंड म्हणून प्रसिद्ध झाला. घायवळ आणि मारणे टोळीला मानणारे अनेक तरुण तयार झाले आणि त्यांचे वर्चस्व वाढू लागले. मात्र या दोघांमध्ये वाद झाला आणि मारणे टोळी आणि घायवळ टोळीमध्ये गँगवार सुरु झाले.