मंगेश जोशी
गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीचे दर दररोज नवा विक्रम प्रस्थापित करत होते. खासकरून चांदीचे दर हे गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढले होते. मात्र शुक्रवारपासून सोने आणि चांदी दोन्हीच्या दरांत घसरण सुरू झाल्याचे पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने दरवाढीचे रेकॉर्ड होत होते, त्याच पद्धतीने दर कोसळण्याचेही रेकॉर्ड व्हायला लागले आहे. शनिवारी जळगावात सोन्याच्या भावात तब्बल १३ हजार रुपयांची, तर चांदीच्या भावात ६० हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीमुळे शनिवारी सोन्याचे दर १ लाख ५५ हजार रुपयांवर, तर चांदीचे दर २ लाख ९० हजार रुपयांवर आले आहेत.
नक्की वाचा: 'बँकिंग गव्हर्नन्स बिल' काय आहे, सामान्यांना त्याचा काय फायदा होईल?
चांदी ६० हजार रुपयांनी घसरली
उत्तर महाराष्ट्राचे मुख्य सुवर्ण केंद्र मानल्या जाणाऱ्या जळगावमध्ये शनिवारी सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घट पाहायला मिळाली. जीएसटीसह सोन्याचे भाव १ लाख ५९ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी घट होऊन जीएसटीसह चांदीचा भाव २ लाख ९८ हजार ७०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आदल्या दिवशीच्या म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत ही घसरण खूप मोठी असल्याचे दिसते आहे.
सोन्याच्या किंमतीतही मोठी घसरण
शुक्रवारच्या दरांची तुलना केली असता, नागपूर सराफा बाजारात ३० जानेवारी रोजी स्टँडर्ड सोन्याचा (९९.५) विक्री दर १ लाख ७४ हजार १०० रुपये होता. २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख ६१ हजार ९०० रुपये मोजावे लागत होते, तर १८ कॅरेटचे दर १ लाख ३४ हजार १०० रुपये होते. चांदीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शुक्रवारी चांदीचा विक्री दर ३ लाख ८३ हजार ३०० रुपये प्रति किलो इतका होता. दागिने घडवण्यासाठी लागणाऱ्या चांदीचा दर ३ लाख ७९ हजार ५०० रुपये होता.
नक्की वाचा: Obesity in India: कोणत्या राज्यात झपाट्याने लोकं होत आहेत लठ्ठ? Economic Survey मध्ये धक्कादायक खुलासा
कालच्या तुलनेत सोने-चांदी किती स्वस्त झाली
आजच्या आणि कालच्या दरांची तुलना केल्यास असे दिसून येते की, अवघ्या २४ तासांत सोन्याचा दर १.७४ लाखांवरून थेट १.५५ लाखांपर्यंत घसरला आहे. ही घसरण सुमारे १३ ते १५ हजार रुपयांच्या घरात आहे. चांदीमध्ये तर ही घसरण ६० हजार रुपयांहून अधिकची आहे, कारण कालचे ३.८३ लाखांचे दर आज २.९० लाखांच्या आसपास आले आहेत. चांदीचे दर ज्या पद्धतीने वाढत होते, ते पाहाता चांदीमध्ये मोठी गुंतवणूक करावी असा विचार करणारे सर्वसामान्य गुंतवणूकदार दरांत घसरण व्हावी यासाठी वाट पाहात होते. चांदीचे दर ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्यानंतर त्यात घसरण होणारच असे भाकीत अनेक तज्ज्ञांनी वर्तवले होते. त्यानुसार ही घसरण होण्यास सुरूवात झाली असून, चांदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी थोडी सबुरी बाळगावी आणि तज्ज्ञांच्या मदतीने चांदीत गुंतवणूक करावी असा सल्ला देण्यात आला आहे.