Gondia News : सध्या सुरू असलेल्या जागतिक घडामोडी आणि विशेषतः आखाती युद्धाचे सावट आता भारताच्या नागरी उड्डाण क्षेत्रावर गडद होऊ लागले आहे. या जागतिक अस्थिरतेमुळे देशातील विमानसेवांना मोठे आर्थिक फटके बसत असल्याचं दिसून येत आहे.
विमानतळ पडलं ओस....
महाराष्ट्रातील गोंदिया येथील बिरसी विमानतळावरील विमानसेवा बंद पडल्याने धोक्याची पहिली मोठी ठिणगी पडली आहे. गोंदिया येथून हैदराबाद आणि इंदूर या शहरांसाठी सुरू असलेल्या दोन्ही विमानसेवा सध्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोंदिया येथील बिरसी विमानतळ बंद पडलं आहे. एकेकाळी गजबजलेले हे विमानतळ अचानक शांत झाल्याने प्रवाशांमध्ये आणि स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली आहे.
युद्धाचा फटका...
ही केवळ एका विमानतळाची समस्या नाही. आगामी काळात देशातील इतरही अनेक लहान विमानतळांवरील सेवा बंद पडण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आखाती युद्धाच्या भडक्यामुळे विमान वाहतूक क्षेत्रासमोर दुहेरी आव्हान उभं राहिलं आहे. युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल महागल्याने 'विमान टर्बाइन इंधन'च्या (Aviation Turbine Fuel) किमतीत मोठी वाढ झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने विमान कंपन्यांचा देखभालीचा खर्च वाढला आहे. सुट्या भागांची उपलब्धता आणि लॉजिस्टिक साखळी विस्कळीत झाल्याने विमान कंपन्यांचे गणित कोलमडलं आहे.