Pune Paithani Saree exhibition: सध्या अधिकमास सुरु आहे. त्याचबरोबर वटपोर्णिमा, रक्षाबंधनाचे सणही येणार आहेत. एकीकडे पारंपारिक सणांची चाहूल लागलेली असतानाच पुणेकर महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये भव्यदिव्य पैठणींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे. जिथे १ लाखांहून अधिक पैठण्या महिलांना पाहता आणि खरेदी करता येणार आहेत.
पुण्यात भव्य साडी प्रदर्शन
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या हडपसर येथे 'सोनाली पैठणी येवला' यांच्या वतीने एका भव्य पैठणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन पैठणीप्रेमींसाठी पर्वणीच ठरत आहे. या प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या तब्बल १ लाखांहून अधिक पैठण्या. केवळ पारंपरिक नक्षीकामच नव्हे, तर आधुनिक काळातील फॅशन ट्रेंडला साजेसे डिझाईन्सही येथे पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा ५०० रुपयांपासून ते अगदी २ लाख रुपयांपर्यंतच्या महागड्या आणि खास पैठण्या येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध रंगसंगती आणि विणकामाचे प्रकार येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील विविध विणकाम शैलींचा मेळ या प्रदर्शनात घालण्यात आला आहे. महिलांना एकाच ठिकाणी सर्व पर्याय उपलब्ध करून देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही, त्यामुळे महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभत आहे. अधिक मासाच्या निमित्ताने नवीन खरेदी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे प्रदर्शन एक उत्तम ठिकाण ठरत आहे. हडपसर परिसरातील हे प्रदर्शन पैठणी प्रेमींसाठी खऱ्या अर्थाने एक सांस्कृतिक उत्सव बनला आहे.