'पालकमंत्री बेपत्ता' पवारांचा कार्यकर्ता थेट पोलिसात गेला, पुढे काय झालं?

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे आहेत. मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
भंडारा:

भंडारा पोलिसांकडे एक तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार काही साधीसुधी नाही. या तक्रारीने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही तक्रार आहे पालकमंत्री गायब झाल्याची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजय मेश्राम यांनी ही तक्रार केली आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत हे आहेत. मात्र ते जिल्ह्यात फिरकत नसल्याने त्यांची गायब झाल्याची तक्रार राष्ट्रवादीच्यावतीने देण्यात आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भंडारा पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये भंडारा शहरात गेल्या अनेक दिवसापासून प्रशासकीय कामावर कुणाचाही, कुठल्याही प्रमाणात नियंत्रण नाही. असे म्हटले आहे. शिवाय शहरात प्रशासकीय कामे 'राम भरोसे सुरु असून अनेक शासकीय यंत्रणेमध्ये अधिकारी आणि कर्माचारी मनमर्जीप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे जिल्हयाच्या विकास कामांना मोठा फटका बसत आहे. अशात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावीत हे मागील सात महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यात आले नसल्याने ते बेपत्ता असल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'कुठे आहे स्फोटक परिस्थिती?' तायवाडेंनी कोणाला केला सवाल?

पालकमंत्री डॉ विजयकुमार गावीत हे २६ जानेवारीला भंडाऱ्यात आले होते. त्यानंतर त्यांचं दर्शन झालेलं नाही असा आरोपही मेश्राम यांनी केला आहे. पालकमंत्री बेपत्ता असल्याने भंडारा जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. बेपत्ता असलेले आमचे पालकमंत्री मोहदयांना शोधून काढा अशी विनंती तक्रार देताना करण्यात आली आहे. ही तक्रार पोलिसांनीही स्विकारली आहे.