सुनिल दवंगे, शिर्डी:
Guru Purnima 2025: आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा, या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते. गुरु शिष्याच्या नात्यातील आदर दाखवणारा आजचा हा दिवस. राज्यभरात गुरुपोर्णिमेचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पवित्र दिनानिमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. शिर्डीमधील साईबाबाच्या दरबारीही भाविकांनी दर्शनासाठी केली असून एका भाविकाने बाबांच्या चरणी तब्बल 65 लाख रुपयांची गुरु दक्षिणा अर्पण केली आहे.
गुरुपौर्णिमा म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धी यांचा संगम. याच पवित्र दिवशी शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात एका निस्वार्थ साईभक्ताने साई चरणी साधारण 65 लाख रुपयांची गुरु दक्षिणा अर्पण केली. या भक्ताने 566 ग्रॅम वजनाचा, सुमारे 59 लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट, 54 ग्रॅम वजनाची सुवर्ण पुष्पं किंमत अंदाजे 3 लाख रुपये तर साधारण दोन किलो वजनाचा चांदीचा नक्षीकाम असलेला हार साईबाबांना अर्पण केला.
या सर्व वस्तूंची एकूण किंमत 65 लाख रुपये असल्याचं सांगीतले जात असून हे दान कोणत्याही प्रसिद्धीशिवाय पूर्णपणे नाव-गाव गुप्त ठेवून करण्यात आल्याच साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आत्मशुद्धीचा आणि भक्तिभावाने गुरूचरणी समर्पणाचा असतो.
या दिवशी साईबाबांना अर्पण केलेली ही सोनं आणि चांदी म्हणजे केवळ मूल्यवान धातू नव्हे, तर भक्ताच्या अंतःकरणातून वाहणारी नितांत श्रद्धा आणि कृतज्ञतेची अनुभूती आहे. या देणगीतून केवळ ऐहिक मूल्य नव्हे तर भावनिक आणि आध्यात्मिक श्रीमंती जाणवते. कोणताही गाजावाजा न करता साई चरणी इतकं मोठं दान अर्पण करणं ही बाब संपूर्ण साईनगरीसाठी आणि सर्व साईभक्तांसाठीही एक प्रेरणा आहे.