गुरू पोर्णिमे निमित्ताने अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरात नित्य काकड आरती पहाटे 4 वाजता होईल. यानंतर पुरोहित पुजारी वृंदांच्या हस्ते गुरूपूजन होईल. बुधवार पेठ येथील स्वामी समर्थ समाधी मठ, गुरू मंदिर, शिवपुरी, राजेराय मठ, बाळाप्पा महाराज मठ, खंडोबा मंदिर, एकमुखी दत्त मंदिर अशा विविध ठिकाणीसुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित या निमित्ताने करण्यात आले आहे.
नित्य अभिषेक बंद
भाविकांना स्वामी दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिराचे महाद्वार गुरुपौणिमेच्या रात्री 2 वाजता उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय गर्दीच्या अनुषंगाने मंदिरात स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अभिषेकाची पावती करणाऱ्यांना प्रसाद दिला जाणार आहे.
श्री शेजारतीने सांगता
सकाळी 11:30 वाजता नियमित संपन्न होणारी महानैवेद्य आरती गुरुपौर्णिमेच्या रोजी सकाळी 10:30 वाजता संपन्न होईल. दुपारी 12 ते 3 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. दर गुरुवारी रात्री 8 वाजता मंदिरात साजरा होणारा श्रींचा पालखी सोहळा गुरू पौर्णिमेच्या रोजी रात्री 7 वाजता संपन्न होईल. यानंतर लगेच शेजारती होईल.
स्वामींनी भेट दिलेल्या 'सूर्यमणी'चे गुरुवारी दर्शन
स्वामी समर्थांनी मालोजीराजे (दुसरे) यांना स्वहस्ते भेट म्हणून दिलेला व सूर्यमणी सर्वांना पाहता येणार आहे. सूर्यमणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी स्वामीभक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांनी दिली. जुना राजवाडा परिसरातील श्री गणेश पंचायतन मंदिराच्या परिसरात हा सूर्यमणी श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्टच्या वतीने गुरुवार, 10 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेत दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. यावेळी राजघराण्यात असलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्या पवित्र मूळ पादुकांचे दर्शनदेखील भाविकांना घेता येणार आहे. श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या प्रयोजनार्थ असलेल्या अनुभूती प्रकल्पामधील 108 फुटी स्वामींच्या मूर्तीच्या खालील ध्यान मंदिरात सूर्यमणी स्थानापन्न करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमाला अक्कलकोटला कसे याल
जर तुम्ही रेल्वेने अक्कलकोट दर्शनासाठी येत असाल तर तुम्ही सोलापूर रेल्वे स्टेशन येथे उतरा. त्यानंतर अवघ्या हाकेच्या अंतरावरती सोलापूर बस स्थानकावरून अक्कलकोटची डायरेक्ट बस घेऊन अक्कलकोटनगरीमध्ये दाखल होता येईल.अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांना राहण्यासाठी अक्कलकोट अन्नछत्रालय मंडळाचे मोठे भक्तनिवास आहे.भक्तनिवास मध्ये अगदी नाममात्र शुल्कात राहण्यासाठी भक्तांची सोय केली जाते . तसेच अन्नछत्रालय मंडळाच्या वतीने भक्तांना मोफत भोजनाचाही आस्वाद घेता येईल.