माधव ओझा, प्रतिनिधी
Hanuman Jayanti 2024 Sangamner : हनुमान जयंती सर्वत्र उत्साहानं साजरी होत आहे. या निमित्तानं सर्व मारुती मंदिरात सकाळपासूनच पूजा, अभिषेक, महाप्रसाद असे वेगवेगळे धार्मिक विधी करण्यात येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांचा आहे. ब्रह्मचारी असलेल्या हनुमानाचा रथ महिलांनी ओढण्याची खास परंपरा इथं अगदी ब्रिटीश राजवटीपासून पाळली जाते. ही परंपरा कशी सुरु झाली याचाही खास इतिहास आहे.
काय आहे इतिहास?
संगमनेरमध्ये हनुमान जयंतीची प्रथा पूर्वापापर चालत आहे. 1929 साली ब्रिटीशांनी इथं मिरवणूक काढण्यास परवानगी दिली नाही. 23 एप्रिल 1929 रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गरडा पडला. पोलिसांचा विरोध पाहून नेते मंडळी घरी परतली. त्यावेळी झुंबरबाई अवसक या मोठ्या हिंमतीनं पुढं आल्या. त्यांनी ब्रिटीशांची दडपशाही न जुमानता हनुमानाचा रथ ओढण्यास सुरुवात केली.
( नक्की वाचा : 'जय हनुमान ज्ञान गुण सागर...'श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा केलं हनुमान चालिसाचं पठण, Video )
झुंबरबाई यांनी दाखवलेलं धाडस पाहून अन्य महिला देखील पुढं आल्या. बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे यांची देखील झुंबरबाईंना साथ दिली. 'पवनसूत हनुमान की जय', 'बजरंग बली की जय' या जयघोषात त्यांनी रथ ओढण्यास सुरुवात केली. या महिलांनी दाखवलेल्या धाडसाचं स्मरण करण्यासाठी संगमनेरमध्ये आजही महिलांना हनुमानाचा रथ ओढण्याचा मान दिला जातो.
संगमनेरमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी होणाऱ्या सर्व प्रथांमध्ये महिलांचा सहभाग असतो. ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी अन्य गावातील भाविक देखील संगमनेरमध्ये येत असतात. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक वातावरणात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला.