संपूर्ण देशभर सध्या लोकसभा निवडणुकीची धूम सुरु आहे. निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच साजरी होणाऱ्या हनुमान जयंतीलाही त्यामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान जयंतीचं औचित्य साधत खास व्हिडिओ शेअर केलाय. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण हनुमान चालिसाचं पठण केलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी हा खास व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केलाय. प्रवीण तरडे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं असून अविनाश-विश्वजीत यांनी संगीत दिलंय. तर छायाचित्रण महेश लिमये यांचं आहे.
लोकसभेत केलं होतं पठण
श्रीकांत शिंदे यांनी यापूर्वी लोकसभेतही हनुमान चालिसा पठण केलं होतं. गेल्या वर्षी लोकसभेत मोदी सरकारवरील अविश्वास दर्शक ठरावावर भाषण करताना त्यांनी हनुमान चालिसाचं पठण केलं होतं. महाराष्ट्रात एक वेळ अशी होती की तेंव्हा हनुमान चालिसाचं पठण करण्यासही अडवण्यात आलं होतं, असा उल्लेख शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला होता.
शिंदे यांना त्यावेळी संसदेतील एका खासदारानं तुम्हाला हनुमान चालिसा येते का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी आपल्याला पूर्ण हनुमान चालिसा येते, असं सांगत लोकसभेतच ती म्हणून दाखवली होती. श्रीकांत शिंदे यांचा तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. तोच संदर्भ घेत शिंदे यांनी पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.
( नक्की वाचा : हनुमान चालीसाचे पठण करताना अजिबात करू नका या चुका, जाणून घ्या नियम )
शिंदे हे 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याणमधून विजयी झाले होते. आता शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर त्यांच्यासमोर ही निवडणूक जिंकण्याचं आव्हान आहे. शिंदे यांचा या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्याशी सामना होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world