भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी
रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना मंगळवारी म्हणजेच 9 जुलै सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाने अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातही सुटी जाहीर
प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने पुणे जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी ही सुटी जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना सुटी असली तरी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत येऊन स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर
रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोमवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मंगळवारी म्हणजेच 9 जुलै रोजी देखील अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री व बावनदी, लांजा येथील मुचकुंदी व काजळी नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही प्रकारची अनुसूचित घटना घडू नये यासाठी मंगळवारी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.