समाधान कांबळे, हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने हिंगोलीत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.
हिंगोली शहरातील अनेक भागांमध्ये वस्तीमध्ये पाणी शिरलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील बोर्डा ते वाई पुलावरून पाणी जात असल्याने या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पहिल्यांदा शहरालगत असलेली कयाधू नदी दुथडी भरुन वाहत आहे. आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात देखील पाणी शिरलं आहे.
औंढा नागनाथ मंदिर
हिंगोली शहरातील बांगर नगरमध्ये पाणी घुसल्याने अनेक जण अडकले होते. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील शासकीय कार्यालय देखील पाण्याखाली गेले. हिंगोलीच्या लाचलुचपत कार्यालयत पाणी घुसलं. संपुर्ण कार्यालय परिसरात गुडघाभर पाणी साचलं असून अधिकाऱ्याकडून महत्त्वाची दस्तावेज सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
Hingoli Rain
सावरखेडा गावानजीक असलेल्या नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. या नदीकाठच्या शेतामध्ये पुरामध्ये सकाळी चार शेतकरी अडकून पडले होते. या शेतकऱ्यांना रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून अनेक भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील हवामान विभागाने केले आहे.