अमोल सराफ, प्रतिनिधी
Hiwara Ashram Vivekananda Janmotsav 2026 : बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची सांगता एका अभूतपूर्व महापंगतीने झाली. निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांनी सुरू केलेल्या या परंपरेने यंदाही आपल्या भव्यतेची प्रचिती दिली. तब्बल 40 एकर परिसरात पसरलेल्या या महापंगतीत लाखो भाविकांनी एकाच वेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा केवळ भोजनाचा कार्यक्रम नसून, शिस्त आणि व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना ठरला आहे.
महाप्रसादाचे भव्य नियोजन
या महापंगतीसाठीची तयारी गेल्या 26 तासांपासून सातत्याने सुरू होती. दीड ते दोन लाख भाविकांच्या पोटची भूक भागवण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाचे नियोजन करण्यात आले होते.
या महाप्रसादासाठी 151 क्विंटल पुरी आणि विदर्भाची खास ओळख असलेली 105 क्विंटल वांग्याची भाजी तयार करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील भोजन वितरण करणे हे एक मोठे आव्हान होते, मात्र आश्रमाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे ते यशस्वीरीत्या पार पडले.
( नक्की वाचा : BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती )
ट्रॅक्टर्स आणि स्वयंसेवकांचा फौजफाटा
दुपारी 5 वाजता जेव्हा महाप्रसादाचे वाटप सुरू झाले, तेव्हा संपूर्ण परिसरात एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. या महाप्रसादाच्या वितरणासाठी 100 ट्रॅक्टर्सचा वापर करण्यात आला. या ट्रॅक्टर्सच्या मदतीने मैदानातील प्रत्येक रांगेपर्यंत भोजन पोहोचवण्यात आले. सुमारे 3000 स्वयंसेवक आणि विद्यार्थी अत्यंत नम्रतेने आणि शिस्तीने भाविकांना महाप्रसाद वाढत होते. राज्यभरातून आलेल्या या अथांग जनसागराला कोणतीही अडचण येऊ नये, याची पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आली होती.
काय आहे परंपरा?
विवेकानंद आश्रमाची ही महापंगत केवळ भोजनासाठी प्रसिद्ध नाही, तर तिथल्या संस्कारांसाठीही ओळखली जाते. महाप्रसादाचे वितरण सुरू होण्यापूर्वी प्रत्येक भाविकाचे गंध आणि फुलांनी पूजन करण्याची विशेष परंपरा येथे आजही जोपासली जाते.
प्रत्येक माणसाला देव मानून त्याची सेवा करणे, हाच विचार यामागे आहे. संत शुकदास महाराजांनी 1965 साली एका छोट्या झोपडीतून सुरू केलेला हा उपक्रम आज वटवृक्षासारखा विस्तारला असून, तो समाजातील जातीभेद आणि अंधश्रद्धा नष्ट करण्याचा संदेश देतो.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )
विवेकानंद विचारांचे केंद्र
कधीकाळी छोट्या स्वरूपात असलेला हा उत्सव आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र बनला आहे. स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वांना एकाच रांगेत बसवून दिला जाणारा महाप्रसाद, हे सामाजिक समतेचे जिवंत उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे केंद्र आज महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या महापंगतीच्या निमित्ताने विदर्भातील लोकसंस्कृती आणि भक्तीचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला.