जाहिरात

BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याबाबत सरकारनं एक महत्त्वाचा आदेश जारी केलाय.

BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु की बंद? खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार का? वाचा सर्व माहिती
BMC Election 2026 : मतदानाच्या दिवशी बँका सुरु राहणार की बंद ? याबाबत अनेकांना संभ्रम आहे.
मुंबई:

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीवर कुणाची सत्ता येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीचा प्रचारही सध्या रंगात आलाय. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी मोठी ताकद लावली आहे. या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या गुरुवारी, म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण मुंबई कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही सुटी केवळ सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नसून बँका, खासगी कंपन्या आणि मॉल्समधील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी प्रशासनाने हे मोठे पाऊल उचलले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी दक्षता पथकेही तैनात केली आहेत.

 बँका आणि सरकारी कार्यालये बंद

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार, 15 जानेवारी रोजी मुंबईतील सर्व सरकारी आणि निमशासकीय कार्यालयांना सुटी असेल. अनेक नागरिकांच्या मनात बँकांच्या कामकाजाबाबत शंका असते.

 मात्र या आदेशानुसार मुंबईतील सर्व बँका आणि सार्वजनिक उपक्रमही मतदानाच्या दिवशी बंद राहतील.एखादा मतदार मुंबई महापालिका क्षेत्रातील आहे परंतु त्याचे कामाचे ठिकाण शहराबाहेर असेल, तरीही त्याला मतदानासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : Pune News : हिंजवडी ते शिवाजीनगर फक्त काही मिनिटांत! पुणेकरांनो वाचा तुमच्या घराखालून कधी धावणार Metro 3? )

खासगी कंपन्या, आयटी पार्क आणि मॉल्सनाही नियम लागू

केवळ सरकारी क्षेत्रच नाही, तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने काढलेल्या आदेशानुसार सर्व कारखाने, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे आणि औद्योगिक उपक्रमांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आयटी कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स आणि रिटेल स्टोअर्सचाही समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी खासगी आस्थापनांनी या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.

दोन ते तीन तासांची विशेष सवलत कुणाला मिळणार?

काही वेळा अत्यंत महत्त्वाच्या किंवा लोकोपयोगी सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसते. अशा अपवादात्मक परिस्थितीत, जेथे कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीमुळे मोठे नुकसान होऊ शकते, अशा ठिकाणी पूर्ण दिवसाच्या सुटीऐवजी किमान 2 ते 3 तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक आहे. 

ही सवलत अशा कर्मचाऱ्यांना दिली जाईल जेणेकरून ते आपला मतदानाचा हक्क बजावून पुन्हा कामावर रुजू शकतील.

सुटी नाकारणाऱ्या कंपन्यांवर होणार कडक कारवाई

मुंबई महानगरपालिकेने या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तिन्ही विभागांसाठी विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आली आहेत. जर एखाद्या कंपनीने किंवा दुकानदाराने आपल्या कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुटी किंवा सवलत नाकारली, तर त्यांच्यावर महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत कडक कारवाई केली जाईल. सुटी मिळत नसल्यास तक्रार करण्यासाठी प्रशासनाने 9122-31533187 हा दूरध्वनी क्रमांकही जारी केला आहे.

लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे हा या सुटीमागचा मुख्य उद्देश आहे. कामाच्या व्यापामुळे कोणीही मतदानापासून लांब राहू नये, यासाठी ही विशेष तरतूद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी सर्व मतदारांना आवाहन केले आहे की, 15 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या या सुटीचा उपयोग करून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com