अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध सातबहिणीच्या डोंगरावर एक थरारक घटना घडली आहे. नवस फेडण्यासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील चार सदस्यांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला चढवला, ज्यामध्ये एका चिमुरडीसह चार जण जखमी झाले आहेत. आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी आलेल्या चाचरकर कुटुंबावर हा प्रसंग ओढावला आहे.
पूजेच्या वेळीच झाला हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, चाचरकर कुटुंबातील सदस्य डोंगरावरील मंदिरात मुलीचा नवस फेडण्यासाठी पूजा करत होते. पूजा विधी सुरू असतानाच अचानक परिसरात असलेल्या मोठ्या मधमाश्यांच्या पोळ्यातील माश्या उठल्या आणि त्यांनी भाविकांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली.
(नक्की वाचा- Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा)
जखमींची नावे
- विठ्ठल चाचरकर
- नत्थू चाचरकर
- कविता चाचरकर
- सायली चाचरकर
जखमींना तातडीने गोविंदपूर आणि तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
पोलीस आणि वनविभागाची धाव
घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि वनपरिक्षेत्राधिकारी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्परता दाखवत बचावकार्य राबवले आणि जखमींना सुरक्षितरीत्या डोंगरावरून खाली उतरवून रुग्णालयात रवाना केले. वनविभागाने भाविकांना अशा डोंगराळ भागात पूजा करताना धूर किंवा मोठा आवाज न करण्याचे आवाहन केले आहे.
(नक्की वाचा- Ahilyanagar News: पारनेर हादरलं! कीर्तनकार महाराजाचं नराधम कृत्य; अमानुष छळ करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार)
सातबहिणी डोंगरावर अनेक मोठी मधमाश्यांची पोळी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा पूजेसाठी लावलेल्या उदबत्तीच्या धुरामुळे अनेकदा या माश्या आक्रमक होतात. त्यामुळे भाविकांनी डोंगरावर जाताना विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.