योगेश शिरसाट
Maharashtra Alcohol Price News : बारमध्ये जाऊन दारू पिणाऱ्या महाराष्ट्रातील दारूप्रेमींच्या जीवाची सोमवारी फार तगमग झाली. आजचा दिवस उजाडूच नये असे त्यांना वाटत होते , कारण आज संपूर्ण महाराष्ट्रातील परमिट रुम आणि बार संपावर गेले होते. आजचा एक दिवसाचा संप हा उत्पादन शुल्कात 60% वाढवल्याने पुकारण्यात आला होता. राज्य सरकारने व्हॅट, परवाना शुल्कात वाढ केल्यानंतर उत्पादन शुल्कही वाढवले होते. ही करवाढ अन्यायकारक असल्याचे म्हणत बारवाले संपावर गेले होते. दारूप्रेमींसाठी (Maharashtra Alcohol Price News) दिलासादायक बाब ही आहे की उद्यापासून बार पुन्हा सुरू होणार आहेत. मात्र प्रश्न असा आहे की राज्य सरकारने केलेल्या दरवाढीमुळे दारूप्रेमींचा खिसा किती कापला जाणार आहे?
बारमध्ये दारू किती रुपयांनी महागणार?
असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स (AHAR) या संघटनेने सोमवारी संपाची हाक दिली होती. सरकारने परवाना शुल्क,व्हॅट आणि उत्पादन शुल्क यामध्ये वाढ केली होती. ही वाढ मागे घेतली नाही तर संपावर जाऊ असा इशारा बार मालकांनी दिला होता, जो त्यांनी खरा करून दाखवला. AHAR चे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी म्हटलंय की कोविडनंतर करण्यात आलेल्या दरवाढीनंतर व्यवसाय करणं कठीण होत चाललं आहे खासकरून या दरवाढीनंतर ते अधिकच मुश्कील झाले आहे. अकोल्यातील बिअर बार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांना आम्ही या दरवाढीनंतर बारमध्ये मिळणारी दारू (Maharashtra Alcohol Price News) किती महागेल असा प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी म्हटले की, 120 रुपयांना मिळणारी बाटली 230 रुपयांना मिळेल. 180 रुपयांना मिळणारी बाटली 250 रुपयांना मिळेल. बिअर सोडून दारूचे इतर सगळे प्रकार महागतील असे त्यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे बारमध्ये एक क्वार्टर (180 ML) 80-100 रुपयांनी महागेल त्यांनी सांगितले.
गाडीमध्ये बसून दारू पिण्याचे प्रमाण वाढेल?
अकोल्यातील बिअर बार संघटनेचे अध्यक्ष अतुल पवनीकर यांनी भीती व्यक्त केली की बारमध्ये दारू पिणे (Maharashtra Alcohol Price News) महाग झाल्याने लोकं वाईन शॉपमधून दारू विकत घेतील आणि ढाब्यावर, गाडीमध्ये बसून किंवा मोकळ्या जागेमध्ये बसून दारू प्यायला लागतील. यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडण्याची दाट शक्यता असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये बारमुळे 4 लाख लोकांना थेट रोजगार मिळतो, 48,000 विक्रेत्यांना आधार मिळतो आणि सुमारे 18 लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या फायदा होतो असा दावा करण्यात आला आहे. बार चालकांना महाराष्ट्र सरकारने केलेली दरवाढ ही अन्यायकारक वाटते आहे. या कर वाढीमुळे करचोरी वाढेल आणि इतर राज्यांतून दारूची तस्करी मोठ्या प्रमाणात होईल, अशी भीती असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स म्हणजेच AHAR ने व्यक्त केली आहे.