भारतीय हवामान विभागाने (IMD) मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज 27 सप्टेंबर रोजी तीन जिल्ह्यांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, तर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यानुसार जिल्हा प्रशासनांनी हा निर्णय घेतला आहे.
हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी आज 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यात सुट्टी जाहीर केली आहे. यानुसार लातूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सुट्टी लागू राहील.
( Mumbai Rains Update: मुंबई-ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी)
नांदेड शहरात पहाटेपासूनच जोरदार पाऊस
हवामान विभागाने कालच नांदेड जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' घोषित केलेला होता, त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना आज सुट्टी दिली होती. हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, नांदेड शहरात आज पहाटे 4 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
धाराशिवमध्येही शाळांना सुट्टी
हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातही 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या सूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे.