
IMD Rain Red Alert News: राज्यात पुढील 24 तासासाठी मुंबई शहर (Mumbai City), मुंबई उपनगर, ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट (Rain Red Alert) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलीय.
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना 18 ऑगस्ट 2025 रोजीच्या संध्याकाळी 5.30 वाजेपासून ते 21 ऑगस्ट 2025 रोजीच्या पहाटे 5.30 वाजेपर्यंत 3.5 ते 4.3 मीटर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला 18 ऑगस्ट 2025 रोजीच्या सकाळी 5.30 वाजेपासून ते 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 3.3 ते 3.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे.
(नक्की वाचा: मुंबईत पावसाचा विक्रम! फक्त 3 दिवसांत पडला अर्ध्या महिन्याचा पाऊस, पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट)
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
- उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली, रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील गड नदी, वाघोटण या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.
- राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत 293 नागरिकांना सुखरूप स्थळी हलवण्यात आले आहे.
- भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (National Remote Sensing Centre) या केंद्रीय संस्थासोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.
(नक्की वाचा: Sangli News :लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय?)
हवामान अंदाजाचे 20 अलर्ट संदेश 34 कोटी नागरिकांपर्यंत
SACHET platform चा वापर करून हवामान अंदाजाचे 20 अलर्ट संदेश 34 कोटी नागरिकांपर्यंत लघुसंदेशच्या (SMS) माध्यमातून पोहोचवण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world