मंगेश जोशी, प्रतिनिधी
Bhusawal News : भुसावळ शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वांजोळा या गावात पाणी भरताना शॉक लागून 25 वर्षीय दिपाली चेतन तायडे या विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र विवाहितेचा मृत्यू अकस्मात झालेला नसून घातपात असल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
वांजोळा गावात राहणारी दिपाली चेतन तायडे ही विवाहिता शुक्रवारी सकाळी पाणी भरत असताना वीज गेल्याने पाण्याच्या मोटरची पिन काढण्यासाठी गेली असता त्याच वेळी वीज पुरवठा सुरू झाला आणि शॉक लागून विवाहिता खाली कोसळली. सदर घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी विवाहितेला तत्काळ भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी विवाहितेला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तसेच विवाहितेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला. विवाहितेच्या मृत्यूबाबत माहेरच्यांना माहिती मिळताच माहेरचे नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल होताच टाहो फोडला .
वांजोळा येथे विवाहितेच्या सासरी बाहुलीची अंत्ययात्रा
जळगाव तालुक्यातील भादली येथील माहेर असलेली दिपाली तायडे या विवाहितेच्या पश्चात पती, 4 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाची मुलगी असा परिवार आहे. मात्र विवाहितेच्या मृत्यूनंतर विवाहितेचा अकस्मात नव्हे तर घातपात झाल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. यावरून ग्रामीण रुग्णालयात विवाहितेच्या माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये काही काळ तणाव देखील निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी दोन्हीही बाजूची समजूत काढली. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी सासरी वांजोळा येथे नातेवाईकांकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली.
मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी ग्रामीण रुग्णालयातून विवाहितेचे शव भादली या तिच्या माहेरीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. अखेर भादली या गावी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी विवाहितेवर अंत्यसंस्कार केले. मात्र वांजोळा येथे अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झालेली असताना माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आल्याने सासरच्यांनी कणकेच्या पिठाची बाहुली करून त्या बाहुलीवर मृत विवाहितेचा फोटो ठेवून अंत्ययात्रा काढत बाहुलीवर अंत्यसंस्कार केले. मृतदेह न मिळाल्याने कणकेच्या बाहुलीवर अंत्यसंस्काराची वेळ विवाहितेच्या सासरच्यांवर आल्याने या प्रकारामुळे ग्रामस्थांचेही डोळे पाणावले होते.
विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र विवाहितेच्या मृत्यूला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप करत सासरच्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे.