किशोर बेलसारे, नाशिक: लग्न हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असतो. लग्नाचा दिवस आयुष्यभर लक्षात यासाठी हा सोहळा खास करण्यासाठी सर्वच प्रयत्नशील असतात. मात्र एका तरुण आयकर अधिकाऱ्यासाठी लग्नाचा दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला आहे. नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्याच दिवशी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हरेकृष्ण पांडे असं या तरुण आयकर अधिकाऱ्याचं नाव आहे. हरेकृष्ण यांचं आयुष्य सुरळीत सुरु होते. शिक्षण, त्यानंतर नोकरी असे आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार पडल्यानंतर हरेकृष्ण लग्नाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले. लग्नासाठी त्यांना आपल्या जोडीदाराचीही निवड केली. मात्र हीच निवड फसली आणि हा निर्णय त्यांच्या जीवावर उठला आहे. जिच्यासोबत संसाराची स्वप्ने बघितल, तिच्यामुळे पांडे यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
झालं असं की हरेकृष्ण पांडे काही दिवसांपूर्वीचा साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्याच्या दिवसापर्यंत सर्वत्र आनंदीआनंद होता. मात्र या साखरपुड्यात होणाऱ्या बायकोचा प्रियकर देखील उपस्थित होता. साखरपुड्यातच नवरी तिच्या प्रियकराशी मजा-मस्ती करत वागत होती. तिथेच नवरीने तिच्या प्रियकराला मिठी देखील मारली. तेथून या सर्व वादाला सुरुवात झाली.
(नक्की वाचा: Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता)
साखरपुड्यातील हा सर्व प्रकार पाहून हरेकृष्ण पांडे मानसिक तणावात गेले. त्यानंतर होणाऱ्या पत्नीने पांडे यांना विविध प्रकारे धमकी, ब्लॅकमेलिंग करणे सुरू केले. या सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून पांडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
आयकर अधिकारी पांडे यांनी लग्नाच्या दिवशीच उत्तमनगरमधील आयकर कॉलनी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर लग्नघरात स्मशानशांतता पसरली. आत्महत्या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)