देवा राखुंडे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षापासून झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक होवू इच्छीणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. निवडणुका कधी लागणार याकडे त्यांचे लक्ष्य लागले आहे. अनेकांनी तयारी ही केली होती. पण निवडणुका काही झाल्याच नाहीत. शिवाय त्या कधी होतील याचा ही नेम नाही. अशात आता एक निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत एक नाही तर तब्बल 600 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजकारणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवाली असं वाटत असतात. त्यामुळे ते निवडणुकांची वाट ही पाहात असतात. त्यासाठी पाच वर्ष तयारीही ओघाने आलीच. पण सध्या निवडणुका होत नाहीत. पण पुणे जिल्ह्यातील इंदापूरची एक निवडणूक त्यामुळे चर्चेत आली आहे. ही निवडणूक आहे, इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची. या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे.
या निवडणुकीसाठी आज मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. या 21 जागांसाठी तब्बल 600 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी मेळावा देखील घेण्यात आला होता. पण उमेदवारी अर्ज पाहाता त्याचा काही एक उपयोग झालेला दिसत नाही.
यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पुढाकार घेतला होता. शिवाय साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनाही अजित पवारांनी बरोबर घेतले आहे. मात्र 21 जागांसाठी 600 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी केलेले प्रयत्न पाण्यात गेल्याचीच चर्चा सध्या परिसरात आहे. त्यामुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मतदान होणार की निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.