Nagpur Crime : नागपुरात एका भारतीय जवानाच्या बेजबाबदार कृत्यामुळे 30 नागपुरकरांचे जीव धोक्यात आल्याचं समोर आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका नगरधन येथून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आर्मी जवानाला चोप दिला. तोंडातून रक्त येईपर्यंत या जवानाला मारहाण करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
सैन्य दलात कार्यरत जवानाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वाहन चालवत होता. तो इथपर्यंत थांबला नाही तर रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या जवळून, त्यांना कट मारत कार चालवली. कार घेऊन जात असताना त्याने रस्त्यातील किमान 25 ते 30 जणांच्या जवळून कार नेत कट मारला. यातील काहींना धडक दिल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने यात कोणी जखमी झालेलं नाही. हर्षपाल महादेव वाघमारे असं या आरोपीचं नाव असून तो भारतीय सैन्य दलात आसाम येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. आरोपी चार दिवसांपूर्वी घरी सुट्टीवर आला होता. त्याला दारूचं व्यसन असल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - नागपुरातील शिंदे गटाच्या नेत्याच्या हॉटेलांतील अवैध कृत्य उघड, पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका नगरधन येथील साई मंदिर, दुर्गा चौक मार्गे हमलापुरीकडे जात असताना त्याचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार नाल्यात जाऊन पलटी झाली. ही घटना रामटेक पोलीस स्टेशनअंतर्गत नगरधन येथे सायंकाळी 8.30 वाजताच्या सुमारास घडली. रामटेक पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील तरुणाला ताब्यात घेतले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.