अजिंक्य धायगुडे, पुणे:
Pune PMPML Free Bus Ride: जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तसेच पुणे मेट्रोने शहरातील महिला प्रवाशांसाठी सर्वात मोठी भेट दिली आहे. पीएमपीकडून पुणे शहरात आज महिलांसाठी दिवसभर मोफत सेवा देण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी शहरातील एकूण ३१ विशिष्ट मार्गांवर धावणाऱ्या महिला विशेष बसमध्ये महिलांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. पीएमपीच्या या निर्णयामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि 'पीएमआरडीए' हद्दीतील हजारो महिला प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कोणकोणत्या मार्गांवर मिळणार मोफत सेवा?
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, मनपा भवन ते वडगाव शेरी, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, एनडीए गेट क्र.१० ते मनपा भवन आणि कात्रज ते शिवाजीनगर या मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, धनकवडी ते न. ता. वाडी, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी आणि भेकराईनगर ते मनपा भवन या मार्गावरही महिलांना विनामूल्य प्रवास करता येईल. लांब पल्ल्याच्या मार्गांमध्ये हडपसर ते निगडी भक्ती-शक्ती, हडपसर ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर गाडीतळ, हडपसर ते मांजरी बु., मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते पुणे स्टेशन या मार्गांवर ही सवलत लागू असेल.
Womens Day 2026: मॅनेजर ते शिपाई.. महिलांच्या हातात लालपरीचा कारभार, रेकॉर्डब्रेक कमाई करुन दाखवली
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, मनपा भवन ते मुकाई चौक किवळे, निगडी ते मेगापॉलिस हिंजवडी, मनपा भवन ते भोसरी, भोसरी ते हिंजवडी माण फेज ३, भोसरी ते निगडी, भोसरी ते पिंपरी गाव, भोसरी ते चिंचवड गाव, चिखली ते डांगे चौक, भेकराईनगर ते वाघोली, शेवाळेवाडी ते पिंपळे गुरव, शेवाळेवाडी ते कात्रज आणि मनपा भवन ते म्हाळुंगे गाव या मार्गांवरही महिलांना कोणतीही तिकिटाची रक्कम न भरता प्रवास करता येणार आहे. शहराच्या सर्व दिशांना जोडणाऱ्या या मार्गांमुळे हजारो महिलांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येईल.
पुणे मेट्रोकडूनही गिफ्ट!
दुसरीकडे, पुणे मेट्रोनेही महिला दिनापासून प्रवासी सेवेत महत्त्वाचा बदल केला आहे. आता मेट्रोच्या प्रत्येक कोचमध्ये महिलांसाठी विशेष राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. केवळ महिलाच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठीही प्रत्येक कोचमध्ये स्वतंत्र जागा आरक्षित राहतील. मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे महिला प्रवाशांनी स्वागत केले असून, यामुळे सार्वजनिक वाहतुकीतील महिलांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे.