जाहिरात

Womens Day 2026: मॅनेजर ते शिपाई.. महिलांच्या हातात लालपरीचा कारभार, रेकॉर्डब्रेक कमाई करुन दाखवली

आगारात एस टीच्या डेपो मॅनेजर पासून ते शिपायापर्यंत व रोखपाल पासून तर बस मॅकेनिकपर्यंत सगळ्याच महिला आहेत.

Womens Day  2026: मॅनेजर ते शिपाई.. महिलांच्या हातात लालपरीचा कारभार, रेकॉर्डब्रेक कमाई करुन दाखवली

निलेश बंगाले, वर्धा:

Womens Day 2026:  आई, बहीण, बायको, मुलगी अशा विविध भूमिका साकारत प्रत्येकाचं आयुष्य फुलवणाऱ्या,  प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला वर्गाचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिलांचा वावर पाहायला मिळत आहे. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वर्ध्यातील बस आगार. वर्धा जिल्ह्यात एक असेही एस टी बस आगार आहे, ज्या आगारात एस टीच्या डेपो मॅनेजर पासून ते शिपायापर्यंत व रोखपाल पासून तर बस मॅकेनिकपर्यंत सगळ्याच महिला आहेत. विशेष म्हणजे बस आगारात असलेल्या 250 एस टी बसच्या देखभाल दुरुस्ती चे कामही या आगारात महिला आणी फक्त महिलाच करतात. 

महिला राज असलेले बसस्थानक! 

जागतिक महिला दिनाचा उत्साह सर्वत्र असताना, वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (श्यामजी पंत) येथील एसटी आगाराने स्त्री-शक्तीच्या बळावर एक नवा आदर्श घालून दिला आहे. या आगाराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील व्यवस्थापनापासून ते थेट वर्कशॉपमधील तांत्रिक कामापर्यंत सर्व जबाबदाऱ्या महिला कर्मचारी यशस्वीपणे पेलत आहेत. केवळ प्रशासकीय सुधारणाच नव्हे, तर आर्थिक आघाडीवरही या आगाराने मोठी झेप घेतली असून, राज्याच्या 'क' वर्ग आगारांच्या क्रमवारीत तळेगावने पाचवा क्रमांक पटकावला आहे.

Happy Women's Day 2026 Wishes 35+: स्वयंसिद्धा तू, रणरागिणी तू... महिला दिन 2026 निमित्त पाठवा शुभेच्छा संदेश

​या आगाराच्या यशाचे सूत्र डेपो मॅनेजर आनंदी बेलोरकर यांच्या नेतृत्वाखालील १७ महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या हाती आहे. येथे डेपो मॅनेजर, रोखपाल, शिपाई आणि महत्त्वाचे म्हणजे बस मेकॅनिक म्हणूनही महिलाच कार्यरत आहेत. एसटी बसच्या देखभाल-दुरुस्तीसारखे कठीण आणि कष्टाचे काम या महिला अत्यंत कौशल्याने करतात. दररोज येथून २५० बस फेऱ्यांचे नियोजन केले जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने १९७ फेऱ्या या शालेय विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ​केवळ सेवाच नव्हे, तर उत्पन्नाच्या बाबतीतही या महिलांनी पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान दिले आहे.

उत्पन्नाच्या बाबतीतही अव्वल

 मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या आगाराच्या नफ्यात १ कोटी १८ लाख रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील १०२ 'क' श्रेणीतील आगारांमध्ये या आगाराचा पाचवा क्रमांक येणे, ही महिलांच्या शिस्तीची आणि मेहनतीची पावती मानली जात आहे. तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या महिला मेकॅनिक जेव्हा अवजड बसची दुरुस्ती करतात, तेव्हा प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या नजरा अभिमानाने उंचावतात. जागतिक महिला दिनी तळेगाव आगाराचा हा 'वुमन पॉवर' पॅटर्न संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Raigad News: लग्नात बस्ता, हळदीला मटण आणि दारू बंद! रायगडच्या 'या' गावातील महिला मंडळाचा क्रांतिकारी निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com