Pune Snacks Centre News: अमेरिका- इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे देशभरात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. मुंबई, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स बंद झाली असून त्याचा फटका नोकरी, शिक्षणासाठी शहरांकडे आलेल्या तरुण- तरुणींना बसत आहे. पुण्यामध्येही गॅसच्या तुटवड्याने हॉटेल बंद झाली आहेत तर काही व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात भाववाढ केली आहे. या भाववाढीमुळे विद्यार्थ्यांच्या खिशाला झळ बसत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांचे हाल होत असतानाच पुण्यातील कर्वेनगर भागात असलेल्या श्री. समर्थ स्नॅक्सने माणुसकी जपत एक आदर्श निर्णय घेतला आहे. सर्वत्र हॉटेलमध्ये भाववाढ झाली असताना विद्यार्थ्यांसाठी जुन्याच दरात सेवा देण्यात येणार आहे.
श्री समर्थ स्नॅक्स सेंटरचा आदर्श निर्णय, विद्यार्थ्यांसाठी माणुसकी जपली!
श्री समर्थ स्नॅक्सचा विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाचा निर्णय! आज दुकानात बरेच विद्यार्थी पोहे, उपमा आणि मिसळचे भाव विचारत होते. सुरुवातीला आम्हाला समजले नाही, पण नंतर लक्षात आले की कमर्शियल गॅसचे दर वाढल्याने साहजिकच मुलांच्या मनात दरवाढीची धाकधूक आहे. गॅसचे दर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी नाईलाजास्तव खाद्यपदार्थांचे दर वाढवले जात आहेत. हॉटेल चालकांना परवडत नसेल तर दरवाढ करणे यात काहीही गैर नाही. पण 'श्री समर्थ स्नॅक्स'ने मात्र यावर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला आहे, असं श्री. समर्थ स्नॅक्स सेंटरच्या मालकांनी म्हटलं आहे.
आमच्याकडे रोज नाश्ता करण्यासाठी येणारे बहुतांश ग्राहक हे UPSC, MPSC ची अहोरात्र तयारी करणारे आणि जवळच्या कॉलेजमधील विद्यार्थी आहेत. घरापासून दूर राहणाऱ्या आणि महिन्याच्या बजेटमध्ये खर्च भागवणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या खिशाला दरवाढ परवडणारी नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच आम्ही ठरवले आहे की, सध्यातरी 'श्री समर्थ स्नॅक्स'मध्ये कोणतेही भाव वाढणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पोटभर खा आणि मन लावून अभ्यास करा...
सध्या एका कमर्शियल गॅस टाकीचा दर ५ हजार रुपयांवर गेला आहे. तरीही विद्यार्थ्यांचा विचार करून आम्ही जुनेच दर कायम ठेवले आहेत. भविष्यात जर गॅसचे दर खूपच जास्त वाढले आणि ते पूर्णपणे आवाक्याबाहेर गेले, तरच आम्हाला नाईलाजाने भाववाढ करावी लागेल. पण जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत आम्ही तुमच्या खिशाला कोणताही अतिरिक्त त्रास देणार नाही. या महागाईच्या काळात 'श्री समर्थ स्नॅक्स' तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करा, तुमच्या खिशाला परवडणाऱ्या स्वादिष्ट नाश्त्याची जबाबदारी आमची, नेहमीप्रमाणे या, पोटभर खा आणि मन लावून अभ्यास करा, असं आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.