जाहिरात

Pune News: आनंदाची बातमी! पुणे शहरात आता 'नो ट्रॅफिक' जॅम, CM फडणवीसांची मेट्रोबाबत सर्वात मोठी घोषणा

भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन आहे.

Pune News: आनंदाची बातमी! पुणे शहरात आता 'नो ट्रॅफिक' जॅम, CM फडणवीसांची मेट्रोबाबत सर्वात मोठी घोषणा
CM Fadnavis On Pune Metro Project
पुणे:

CM Devendra Fadnavis On Pune Metro : पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.दररोज जवळपास अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन आहे, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देशही फडणवीसांनी दिले आहेत.त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही सुद्धा फडणवीसांनी यावेळी दिली. पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन'चे उद्घाटन  फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ,पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे,खासदार मेधा कुलकर्णी,आमदार योगेश टिळेकर,भीमराव तापकीर,सुनील कांबळे,हेमंत रासने,बापू पठारे,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता,पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

पुणे शहरात 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित

फडणवीस म्हणाले,पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो.मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन,मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

नक्की वाचा >> Pune News: 2 सिलिंडर स्फोटाने पुणे हादरलं! 'या' परिसरात लोकांची पळापळ, आगीत एका बससह भंगार दुकाने जळून खाक

सध्या पुणे शहरात जवळपास ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे.टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजनआहे.

या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे शहराची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण २०० किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे,सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स,नवीन विमानतळ,औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे,अशा सूचना त्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या.पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये रात्री फिरताना अलर्ट राहा! 'या परिसरातील नागरिकांच्या घरांवर झाला सुतळी बॉम्ब हल्ला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या,पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे.अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.

मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता.त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने रिंग रोड,रुंद रस्ते,सेवा रस्ते,भुयारी मार्ग,पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड आणि हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकात पुणे मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.मेट्रो भवनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहितीदेखील त्यांनी दिली.आता पुणे मेट्रोला सुसज्ज असं मेट्रो भवन मिळालं आहे, निश्चितपणे अधिक गतीने आम्ही काम करु. 

मेट्रो भवन, पुणे – ठळक वैशिष्ट्ये

▪️एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर.
▪️भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक      वारशाचे दर्शन घडविणारी कला स्थापना.
▪️अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.
▪️३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.
▪️काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com