Jalgaon Political News: "भाजपकडून आपली खाट टाकण्याचा प्रयत्न", शिंदेंच्या आमदाराची स्वबळाची घोषणा

Jalgaon News: आमदार किशोर पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वाची स्पर्धा हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

Jalgaon Politics : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही याचे संकेत हळूहळू मिळत आहेत. जळगाव जिल्ह्यात महायुतीत धुसफूस सुरु झाली आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवण्याची थेट घोषणा केली आहे. किशोर पाटील हे राज्यातील असे पहिले आमदार आहेत, ज्यांनी जाहीरपणे महायुती न करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

किशोर पाटील यांनी ही घोषणा करताना भाजपवर थेट निशाणा साधला. 'भाजपकडूनच आपली खाट टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असे म्हणत त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली. महायुतीमधील काही नेते आपण एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगत असले तरी, पाटील यांच्या आक्रमक भूमिकेने स्थानिक पातळीवरील मतभेद समोर आले आहेत. पाटील यांनी भाजपला थेट आव्हान देत म्हटले की, पाचोरा व भडगाव या दोन्ही नगरपालिकांवर, तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

आमदार किशोर पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमागे स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वाची स्पर्धा हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत असले तरी, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध करण्याची तयारी करत आहेत. पाटील यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

किशोर पाटील यांनी दिलेले हे थेट आव्हान केवळ स्थानिक पातळीपुरते मर्यादित नसून, त्याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नेत्यांचे म्हणणे आणि स्थानिक पातळीवरील वास्तव यात मोठा फरक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी महायुतीचा धर्म पाळला जाईल का, हा मोठा प्रश्न त्यांच्या वक्तव्याने निर्माण केला आहे. यामुळे येत्या काळात जळगावचे राजकारण अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article