लक्ष्मण सोळुंके, जालना
मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीतील 8 जणांना गोंदी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्यासह उपोषणात बसलेल्या इतर उपोषणकर्त्यांच्या जुन्या आजारांचे वैद्यकीय रिपोर्ट उपलब्ध करून न दिल्याने पोलिसांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. उपोषणातील सर्व उपोषणकर्त्यांच्या नावाच्या सविस्तर यादीसह त्यांचे मोबाईल क्रमांक, उपोषणकर्त्यांचे पत्ते द्या, अशी मागणी पोलिसांनी कोअर कमिटीकडे केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांना औषधोपचार घेण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही उपोषणकर्ते उपचार घेत नसल्यानं त्यांच्या तब्येतीवर परीणाम होत आहे. उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर बरे-वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घ्या, असंही या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
Manoj Jarange
कोअर कमिटीतील कुणाला नोटीस?
- किशोर मरकड
- पांडुरंग तारख
- शैलेंद्र पवार
- श्रीराम कुरणकर
- सुदाम बाप्पा मुकणे
- संजय कटारे
- किशोर नरवडे
- बालाजी इंगळे
धनंजय देशमुख देखील उपोषणात सामील
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हे मनोज जरांगे यांच्या सामूहिक उपोषणात सहभागी झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागतच करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली.