जालन्यामध्ये मजुरांच्या शेडवर वाळू टाकल्याने अंगावर शेड कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे. टिप्पर चालकाने पत्र्याच्या शेडवर वाळू आणून टाकल्याने शेड कोसळले आणि झोपेतच या सर्वांचा करुण अंत झाला. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यामधील जाफराबाद तालुक्याच्या पासोडी- चांडोळ रस्त्याचे काम सुरु आहे. या पुलाचे काम करण्यासाठी आलेले कामगार हे पत्र्याचे शेड बांधून राहत होते. आज मध्यरात्रीएका टिप्पर चालकाने पुलांचे काम करून झोपलेल्या मजुरांच्या लोखंडी शेडवर टिप्परमधील वाळू टाकली. या वाळूचं वजनाने टिनपत्र्याचे शेड अंगावर कोसळून 5 कामगारांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला.
आज भल्या पहाटे कामगार तातपुरता निवारा करून राहत असलेलं शेड आढळून न आल्यानं ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.