संजय तिवारी, प्रतिनिधी
JEE Mains Exam Result 2024 : बारावीनंतर आयआयटीसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत नागपूरचा निलकृष्ण (Nilkrishna Gajre) गजरे हा 100 पर्सेंटाईल मिळवून देशात पहिला आलाय. निलकृष्णचे वडील वाशिम जिल्ह्यात शेती करतात तर आई गृहिणी आहे. सामान्य कुटुंबातील या मुलानं आपल्या ध्येयावर फोकस ठेवत हे मोठं यश मिळवलंय. निलकृष्णनं 'NDTV मराठी' शी बोलताना या यशाचं गुपित सांगितलंय.
मोबाईल बंद
निलकृष्णचे वडील निर्मलकुमार गजरे हे वाशिम जिल्ह्यात शेती करतात. तर आई योगिता या गृहिणी आहेत. त्याला एक बहिण असून ती 11 वी मध्ये शिक्षण घेतीय. निलकृष्ण जेईईच्या तयारीसाठी आईसोबत नागपूरमध्ये राहत असे. 'मला दहावीमध्ये 97 टक्के मार्क्स होते. सायन्सची आवड असल्यानं त्याच शाखेत प्रवेश घेतला. अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यापासून मी जेईईवर फोकस करुन अभ्यास सुरु केला. मला चांगले मार्क्स मिळतील ही आशा होती, पण इतकं परफेक्ट पर्सेंटाईल मिळालं हे पाहून आश्चर्य वाटलं, असं निलकृष्णनं सांगितलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )
निलकृष्णच्या वयातील अनेक मुलांना मोबाईलचा नाद लागलेला असतो. पण, त्यानं या परीक्षेवर फोकस करण्यासाठी मोबाईल वापरणे बंद केले होते. विरंगुळा म्हणून 15 दिवसांमध्ये एक सिनेमा पाहत होतो, असं त्यानं सांगितलं. पहाटे पाच ते रात्री दहा असा माझा दिनक्रम होता. त्यामध्ये किमान 12 तास अभ्यास होईल यावर भर दिला.
तुम्ही सतत दोन वर्ष मेहनत करा. त्याची तयारी करा, असा सल्ला त्यानं JEE ची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलाय. JEE अडव्हान्स परीक्षा माझं टार्गेट आहे. आयआयटी मुंबईत कॉम्पयुटर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणं हे माझं लक्ष्य आहे. एक चांगला इंजिनिअर होणं हे ध्येय आहे, असं निलकृष्णनं सांगितलं.
( नक्की वाचा : UPSC निकालानंतर कच्चा घरातील सेलिब्रेशन डोळ्यात पाणी आणणारं! )
मुलगा असावा तर असा
निलकृष्णनं मिळवलेल्या यशानं त्याचे आई-वडील चांगलेच आनंदित झाले आहेत. माझी शेती ही निसर्गाच्या भरवशावर आहे. त्यामध्ये मेहनत खूप करावी लागते. मुलानं खूप शिकावं. माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा होती. ती त्यानं पूर्ण केली आहे. मुलगा असावा तर असा अशी भावना त्याचे वडिल निर्मलकुमार यांनी व्यक्त केली. मोबाईलपासून दूर राहा. रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण झाला पाहिजे असा त्याला सल्ला दिला होता, असं त्यांनी सांगितलं.