देवा राखुंडे, जेजुरी:
Jejuri Khandoba Bhandara Fire: एकीकडे राज्यभरात नगरपरिषद, नगरपंचायत निकालांचा जल्लोश सुरु असतानाच खंडेरायाच्या जेजुरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये काही जण भाजल्याची घटना घडली आहे. जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेराया चरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते सोबतच भांडार उधळत होते.
जेजुरीत भंडाऱ्याचा फडका, विजयी उमेदवार भाजले
फटाके वाजत असताना भंडाऱ्याचा भडका होऊन त्यामध्ये सुमारे 16 जण भाजले असल्याची माहिती आहे. यामध्ये आताच निवडून आलेल्या नगरसेवकांचा देखील समावेश आहे. ही घटना दुपारी घडली घटनेत भाजलेल्या जखमींना खाजगी व सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुन्हा एकदा भेसळी युक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आताच निवडून आलेल्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या नगरसेविका मोनिका राहुल घाडगे व त्यांचे पती राहुल घाडगे यांचा तसेच प्रभाग क्र.५ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका कु.स्वरूपा खोमणे आदींचा समावेश आहे. मल्हार नाट्यगृह येथे मतमोजणी व निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार व कार्यकर्ते खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करण्यासाठी गेले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उधळण केलेल्या भंडाऱ्याने अचानक पेट घेतला व स्फोटही झाला या मध्ये सुमारे १६ जण भाजले असून यात महिलांचा समावेश आहे.
जखमींची नावे:
१)रुपाली खोमणे २)विलास बारभाई , ३)सानिका गाढवे , ४) संस्कार गलांगे , ५)देवल बारभाई , ६)मनीषा चव्हाण ,७)रजनी बारभाई , ८)स्वप्नील लाखे , ९)अनिल बारभाई , १०)गणेश चव्हाण ११)निशा दादा भालेराव १२)लक्ष्मी माऊली खोमणे १३) मोनिका राहुल घाडगे ( नवनिर्वाचित नगरसेविका )१४)राहुल कृष्णा घाडगे ,१५ )कु.स्वरूपा जालिंदर खोमणे (नवनिर्वाचित नगरसेविका ) १६)उमेश भंडलकर
सुप्रिया सुळेंचा संताप...
जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने भडका उडून झालेल्या दुर्घटनेत काही जण गंभीररित्या भाजल्याची घटना घडली. यामध्ये विजयी उमेदवारांचाही समावेश आहे. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेच्या संदर्भात मी सविस्तर माहिती घेतली असून प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहे, असे ट्वीट सुप्रिया सुळेंनी केले आहे.
दरम्यान,जेजुरीत बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याच्या तक्रारी यापुर्वीच स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या. परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. खंडेरायाच्या चरणी प्रार्थना आहे की, या घटनेत जखमी असणारे सर्वजण लवकरात लवकर बरे होऊन घरी परत यावे. शासनाने या घटनेची तातडीने चौकशी करुन या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी.