Kalyan Malshej Highway: कल्याण-माळशेज राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने (NH Division) शहाड पुलावर (Shahad Bridge) अत्यावश्यक दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे (Strengthening and Renovation) काम हाती घेतल्यामुळे हा पूल एकूण 18 दिवसांसाठी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
या वाहतूक बदलांमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक विभागाने महत्त्वाचे पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन दिशांसाठी जाहीर केलेले पर्यायी मार्ग (प्रवेश बंद आणि वळण)
शहाड पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद असल्यामुळे, वाहतूक विभागाने (पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर, पंकज शिरसाट) खालीलप्रमाणे वाहतूक वळवली आहे:
1. माळशेजकडून कल्याणकडे येणारी वाहने:
प्रवेश बंद: ठाणे ग्रामीण हद्दीत हॅम फाटा, मुरबाड येथे 'प्रवेश बंद'.
पर्यायी मार्ग: सदर वाहने डॅम फाटा, बदलापूर रोडने बदलापूर पालेगाव, नेवाळी नाका, मलग रोड, लोढा पलावा / शिळ डायघर रोड / पत्रीपूल, कल्याण मार्गे इच्छित स्थळी जातील.
2. मुरबाडकडून शहाड पुलावरून कल्याणकडे जाणारी वाहने:
प्रवेश बंद: ठाणे ग्रामीण हद्दीत दहागाव फाटा (रायतागाव) येथे 'प्रवेश बंद'.
पर्यायी मार्ग: सदर वाहने दहागाव फाटा (रायतागाव) येथे डावीकडे वळून वाहोली गाव, मांजली, बदलापूर-पालेगाव, नेवाळी नाका, मलग रोड, लोढा पलावा / शिळ डायघर - दहागाव, एरंजडगाव रोड / पत्रीपूल, कल्याण मार्गे इच्छित स्थळी जातील.
( नक्की वाचा : Dombivli News : 'सुसंस्कृत' डोंबिवलीला कुणाचा कलंक? आमदाराच्या भावावर रात्री पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ! )
3. कल्याणकडून मुरबाडकडे जाणारी वाहने:
प्रवेश बंद: कल्याण वाहतूक उपविभाग हद्दीत दुर्गाडी पूल येथे 'प्रवेश बंद'.
पर्यायी मार्ग: सदर वाहने दुर्गाडी पुलावरून उजवीकडे वळून पुढे गोविंदवाडी बायपास, पत्रीपूल, चक्की नाका मार्गे नेवाळी, पालेगाव, बदलापूर मार्गे मुरबाडकडे इच्छित स्थळी जातील.
वाहतूक निर्बंधांचा कालावधी
मुख्य निर्बंधाचा कालावधी: 28 सप्टेंबर 2025 च्या मध्यरात्री 00:01 वाजेपासून ते 15 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री 24:00 वाजेपर्यंत. या संपूर्ण 18 दिवसांच्या कालावधीत कल्याण-माळशेज मार्गावरील शहाड पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
वाहतूक बंद करण्याचे कारण काय?
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने मे. संरचना कंपनीमार्फत शहाड पुलाचे सशक्तीकरण (मजबुतीकरण) आणि नूतनीकरणाचे (बेअरिंग बदलण्याचे) काम हाती घेण्यात आले आहे. हे तातडीचे काम वेळेत आणि पूर्णपणे सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी पुलावरील वाहतूक थांबवणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे परिसरातील संभाव्य वाहतूक कोंडी टळून काम जलद गतीने पूर्ण होईल.
अत्यावश्यक सेवांना सूट
हा वाहतूक नियंत्रण आदेश काही अत्यावश्यक सेवांतील वाहनांना लागू होणार नाही. सूट मिळालेल्या वाहनांमध्ये खालील प्रमुख वाहनांचा समावेश आहे:
पोलीस वाहने (Police Vehicles)
अग्निशमन दलाची वाहने (Fire Brigade)
रुग्णवाहिका (Ambulances)
ग्रीन कॉरीडोर (Green Corridor)
ऑक्सिजन गॅस वाहने (Oxygen Gas Vehicles)
इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने
प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक विभागाने केले आहे.